Tuesday , March 3 2026
Breaking News

दीन- दलितांची ‘माय”, कुटुंबीयांची प्रेमळ “आक्का”

Spread the love

 

आयुष्यात अशी काही व्यक्तिमत्व येतात जे दिसायला साधी, सोपी, सरळ वाटत असली तरी त्यांच्या अंतःकरणातील खणखरता आणि करुणेचा खोल ऊब सर्व समाजाला कवटाळून घेते. माजी आमदार, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळी (तात्या) यांच्या धर्मपत्नी शांताबाई म्हणजेच आम्हा सर्वांच्या “आक्का” हे देखील एक असेच तेजस्वी व्यक्तिमत्व. आज त्या आपल्यात नाहीत; पण त्यांचा सेवाभाव, कुटुंबीयांप्रति असलेले निस्वार्थ प्रेम, समाजासाठीची तळमळ अजूनही जशीच्या तशी जिवंत आहे. पावलोपावली जाणवणारी, अंतःकरणाला भिडणारी.
“आक्का” म्हणजे शेतकरी कुटुंबातील एक शांत प्रकाश. बेळगाव पासून जवळच असलेल्या मच्छे या गावात “आक्का”चा जन्म कष्टकरी शेतकरी कुटुंबात झाला. गाठीला तितकेसे शिक्षण नसले तरी स्वभावातील प्रांजळपणा आणि मनातील सत्वगुण यामुळे “त्या” लहानपणापासून घडत गेल्या. “तात्यां”च्या सहवासाने “आक्का”च्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले आणि हाच त्यांच्या जीवनातील खरा टर्निंग पॉईंट ठरला. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार अंगीकारलेल्या “तात्यां”च्या कार्यप्रवाहात “त्या” सावित्रीबाईंच्या सामर्थ्याची आठवण करून देणाऱ्या जणू दुसऱ्या सावित्रीच ठरल्या. समाजकार्यासाठी “आक्का”ची खंबीर साथ “तात्यां”ना लाभली. 1957 मध्ये “तात्यां”नी विश्वभारत सेवा समितीच्या रूपाने शिक्षणाच्या दीपज्योतीची स्थापना केली. शिक्षण तळागाळात पोहोचले पाहिजे, दीन-दलित, शेतकरी, श्रमिक समाजातील मुले शिकली पाहिजेत या ध्येयाच्या पाठीशी “आक्का” सदैव खंबीर उभ्या राहिल्या. येळ्ळूरच्या शिवाजी विद्यालयातील वसतीगृह हे त्यांचे प्रेमाचे घर. तिथल्या मुलांना त्यांनी पुत्रवत जपले. त्यांना स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालत, त्यांना चांगले संस्कार देत त्यांच्या सत्वशील मातृत्वाने अनेक अनाथ गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून निघाले.
ग्रामीण शिक्षणाची दीपवाहिनी गुरुवर्य म्हणजेच “तात्यां”ना शैक्षणिक प्रसारासाठी मिळेल त्या वाहनाने तर कधी पायी फिरावे लागे. त्या प्रत्येक प्रवासात “आक्का” त्यांच्यासोबत असत. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणे हे काम “त्या” शांतपणे, प्रेमाने करीत असत. त्यांचे बोलणे, त्यांची आत्मीयता अनेक मातांना आपल्या मुलांना शिक्षणाकडे वळविण्याची प्रेरणा देत असे. दोघांच्या तळमळीने आज बेळगाव, खानापूर, हुक्केरी तसेच चंदगड तालुक्यात तब्बल 28 शैक्षणिक शाखा ज्ञानदीप प्रज्वलित करीत आहेत.

कुटुंबाची सावली बनलेली “आक्का”

“तात्यां”चे कार्य अखंड सुरू असल्याने कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ अपुरा पडत असे. पण “आक्का”ने ही उणीव देखील भरून काढली. त्यांचे सुपुत्र विजय, प्रकाश, दिवंगत अरुण आणि कन्या श्रीमती विमल, श्रीमती ललिता या पाचही मुलांवर त्यांनी निस्सीम प्रेम केले. सर्व सुनांना लेकींसारखी वागणूक दिली. अल्पशिक्षित असून देखील त्यांनी मुलांना उच्चशिक्षित बनवले. आज त्यांचे सुपुत्र विजय आणि प्रकाश हे आई-वडिलांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. हे “आक्का”च्या मातृत्वाचे समर्पक दर्शन.

आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातही सेवेचाच ध्यास

वृद्धापकाळानंतरही त्यांच्यातील सेवाभाव कमी झाला नाही. शहापूर येथील सिद्धार्थ वसतीगृहात राहून त्या गरीब, दिन-दलित मुलांची सेवा करीत राहिल्या. अखेरच्या श्वासापर्यंत “त्या” मातृत्वाचा दिवा हातात धरून उभ्या होत्या. आज ती मुले या दयामाई-मायला मुकली आहेत. त्यांच्या डोळ्यात पाणी आहे आणि अंतःकरण शून्य.

न संपणारा वारसा

“आक्का” आज आपल्यात नाहीत पण त्यांची स्मृती चिरकाल जिवंत आहे. जगण्याची साधी वाट सेवाभावनेने सुगंधित प्रत्येक क्षण, शिक्षणासाठीची अथक तळमळ हे सर्व आगामी पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांनी उभ्या केलेल्या सेवा धर्माच्या परंपरेला काळ कधीच पुसू शकणार नाही. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच अंतःकरणातून निघालेली आदरांजली!!

– सुहास प्रकाश हुद्दार, संपादक, बेळगाव वार्ता

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *