
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीशी अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर ग्रामस्थांनी संबंधित मुख्याध्यापकाला प्रश्न विचारताच गावकऱ्यांसमोरच त्याने कृत्याची कबुली दिली, अशी माहिती मिळाली आहे.
कबुलीनंतर संतप्त ग्रामस्थांनी त्या मुख्याध्यापकाला चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले. घटना उघड झाल्यानंतर संतप्त विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी त्याला चपलेचा हार घालण्याचा प्रयत्न केला होता; मात्र परिस्थिती ताणू नये म्हणून पोलिसांनी त्यांना थोपवले.
तसेच, संबंधित शिक्षकाने “मी एका राजकीय पुढाऱ्याचा भाऊ आहे… मला राजकीय वरदहस्त आहे” अशी उर्मट फुशारकी मारल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गावात वेगाने पसरली आहे.
या घटनेबद्दल बेळगुंदी ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपी मुख्याध्यापकावर तात्काळ कठोर गुन्हा नोंदवून पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta