


येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात दिवंगत शांताबाई (आक्का) परशुराम नंदिहळ्ळी यांना शिवाजी विद्यालयाच्या वतीने तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. शोक सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक व श्री शिवाजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एम बी बाचीकर हे होते. प्रारंभी कै. शांताबाई नंदिहळ्ळी यांच्या फोटोचे पूजन सामाजिक कार्यकर्ते डॉ. तानाजी पावले, माजी मुख्याध्यापक एम बी बाचीकर, प्रा. सी.एम. गोरल व बळीराम देसुरकर यांनी केले.
शोक सभेत बोलताना प्रा. सी. एम. गोरल म्हणाले, एक सत्वशील, सोशिक व नावाप्रमाणेच शांत अशा स्वभावाच्या कै. शांताबाई (आक्का) नंदिहळ्ळी यांनी विश्वभारत सेवा समिती ही संस्था उभारणीसाठी खूप हाल, अपेष्टा सोसल्या. संस्थेच्या उभारणीत व जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्या खऱ्या अर्थाने संस्थेच्या आधारस्तंभच होत्या. दीनदलित विद्यार्थ्यांनी शिकावे, मोठे व्हावे यासाठी त्या कायम झटत असत. बोर्डिंग मधील विद्यार्थ्यांना त्या स्वतः जेवण तयार करून वाढीत असत. गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी सरांच्या प्रत्येक प्रसंगात त्या सावलीप्रमाणे उभ्या राहिल्या व संस्था उभारण्यासाठी मोलाची साथ दिली. म्हणूनच कै. शांताबाई (आक्का) या संस्थेच्या खऱ्या शिल्पकार आहेत.
यावेळी बोलताना माजी मुख्याध्यापक एम बी बाचीकर म्हणाले, कै. शांताबाई नंदिहळ्ळी यांनी अस्पृश्य व दीनदलित समाजातील मुलासाठी शिक्षणाची दारे खुली यासाठी पती परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. म्हणूनच विश्वभारत सेवा समितीची स्थापना झाली. आज या संस्थेच्या 28 शाखा असून, संस्थेच्या विविध शाळांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही अभिमानाची बाब आहे.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक संजय मजुकर यांनीही आक्कांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. शोकसभेला श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक एच एस लोकळूचे, के वाय सावंत, शिक्षिका विद्या पाटील, रेखा पाटील, अर्चना कोळी, आर व्ही कुलकर्णी, निर्मला कंग्राळकर, अक्षता जाधव यांच्यासह शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta