Saturday , December 13 2025
Breaking News

साम्यवादी चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार कॉ. कृष्णा शहापूरकर

Spread the love

 

बेळगावच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली ५५ वर्षे क्रियाशील असलेले कार्यकर्ते कॉ. कृष्णा शहापूरकर यांचा आज दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत् शरदः शतम्.

त्यांचा जन्म श्रमजीवी कुटुंबात झाला. वडिल लक्ष्मण शहापूरकर हे ट्रकचालक होते. त्यांचे घर भोईगल्लीत. मात्र त्यांचा जन्म आजोळी झाला. त्यांच्या मामाचा आणि आजीचा त्यांच्यावर विशेष लोभ असल्याने या दोघांनी त्यांना वाढवले. मामांचे नाव नारायणराव मेणसे. त्यांचा चुरमुरे आणि फरसाणाचा व्यवसाय होता. घरातच दुकान होते. त्यांचा ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क होता. टेंगीनकेरा गल्ली, कामत गल्ली, माळी गल्ली, मेणसे गल्ली हा भाग म्हणजे कार्यकर्त्यांचा भाग मानला जाई. स्वातंत्र्य चळवळ, गोवामुक्ती आंदोलन, सीमालढा या व अशा अनेक चळवळीत या भागातील कार्यकर्त्यांनी भरीव योगदान दिलेले आहे. त्यांचे मामा नारायणराव हे या चळवळीचे सहानुभूतीदार होतेच. शिवाय कॉ. कृष्णा मेणसे यांचे भाऊबंद व हितचिंतक होते. त्या काळात रामचंद्रराव ताशिलदार, शाहीर गणपत मणगुतकर, लक्ष्मणराव घसारी, ईश्वरआण्णा दिवटे, राजाराम हलगेकर अशी मंडळी या भागाच्या नेतृत्वात असत. वातावरण भारावून गेलेले असे. अनेक उत्सव साजरे होत. शहापूरकरांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व नंतर त्यांनी प्रेसमध्ये काम करण्यास सुरूवात केली. मात्र वाचन आणि अभ्यास सुरू ठेवला. शहापूरकरांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती एका घटनेने. साल होते १९६७. कॉ. कृष्णा मेणसे बेळगाव शहर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत होते. त्यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजी उद्यानात शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होता. मैदान खचाखच भरलेले होते. शाहीर अमर शेखांच्या पोवाड्यानी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. पोवाड्याच्या कार्यक्रमानंतर कॉ. कृष्णा मेणसे यांचे प्रभावी भाषण झाले. भाषणानंतर त्यांनी मैदानातून कोणी कसे बाहेर जावे, याबाबत मार्गदर्शन केले आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले की त्यांनी श्रोत्यांना मदत करावी. सर्व श्रोते बाहेर पडल्यानंतर कॉ. मेणसे यांच्या सभोवताली काही कार्यकर्ते उभे होते. त्यांच्यामध्ये शहापूरकरही होते. त्यावेळी कॉ. मेणसे यांनी शहापूरकरांची आपुलकीने चौकशी केली व ‘तू तर आमच्याच भागातला आहेस, उद्या शनिमंदिरजवळील कार्यालयात ये.’ असे म्हटले. त्यानंतर शहापूरकर त्यांना भेटू लागले व तेव्हापासून ते जे ‘साम्यवादी’ चळवळीत आले ते आजही निरपेक्षवृत्तीने या चळवळीशी एकरूप झाले. आजच्या काळात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहजपणे पक्ष बदलताना दिसतात. मोहाला बळी पडतात. दडपणाला घाबरतात. पण शहापूरकरांच्याबाबत असे काहीही घडू शकले नाही. एक साम्यवादी तत्व अनुसरल्यानंतर त्यापासून दूर जाण्याचा कसलाही विचार त्यांच्या मनाला आजतागायत शिवलेला नाही हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

साम्यवादी चळवळीत

वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारची कामे कार्यकर्ते करीत असतात. कुणी कामगार संघटनांचे काम करतो. तर कुणी शेतकरी संघटनेचे, पक्षाचे इत्यादी इत्यादी. कॉ. शहापूरकर यांनी सुशिक्षित बेरोजगार संघटना, फुले कामगार संघटना, प्रेस कामगार युनियनमध्ये पदाधिकारी म्हणून काम केले. त्याबरोबरच वैचारिक क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेला सर्वात जुना पत्रकार म्हणून आज ते ओळखले जातात. पण म्हणून इतर क्षेत्राशी त्यांचा संबंध आला नाही असे नाही. जेथे संप होत तेथे, जेथे शेतकऱ्यांचे लढे होत तेथे ते धावून गेलेले आहेत. आपणास अटक होईल, त्यामुळे आपले नुकसान होईल अशी भीती त्यांच्या मनाला कधीच शिवली नाही. सीमा लढ्यात ते मनःपूर्वक उतरले. त्या काळात प्रभात फेऱ्या काढण्याचे काम केले जाई. त्यात ते असत. कॉ. मेणसे यांनी जेव्हा शहर लढा समिती स्थापन केली त्यामध्ये ते होते. या समितीच्यावतीने जेव्हा रेल्वे रोको सत्याग्रह झाला त्यात भाग घेऊन त्यांनी तुरूंगवासही भोगला. पुढे ही सर्व मंडळी सीमा चळवळीतून बाहेर पडली. आता आपण श्रमजीवी वर्गाचीच चळवळ पुढे न्यायची. पण आपल्या कोणत्याही कृतीमुळे सीमा चळवळीला बाधा येणार नाही याची काळजी घ्यायची हे तत्व त्यांनी स्विकारले आणि या सर्वांनीच ते पाळले आहे. पत्रकार म्हणून त्यांची जडणघडण सुरूवातीस मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ उटगी (‘विशाल महाराष्ट्र’चे सहसंपादक), बेळगाव समाचारचे संपादक प्रभाकरपंत परूळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आपणावर प्रभाकरपंत परूळेकरांचा प्रभाव असल्याचे शहापूरकर सांगतात. पुढे १५ ऑगस्ट १९६९ रोजी जेव्हा कॉ. कृष्णा मेणसे यांनी साप्ताहिक ‘साम्यवादी’ची स्थापना केली तेव्हा त्यांचे सहकारी म्हणून कॉ. शहापूरकर ‘साम्यवादी’शी सहसंपादक म्हणून जोडले गेले. साम्यवादीत लिहिण्याबरोबरच त्यांनी वितरणाचीही जबाबदारी पार पाडली. विविध कारणांनी कॉ. शहापूरकरांना नंतर इतर वृत्तपत्रातून कामे करावी लागली. पण ‘साम्यवादी’शी त्यांची नाळ कायम राहिली. त्यांनी दै. समाज, दै. पुढारी, मराठा, नवशक्ती या दैनिकांचे बेळगावातील प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. कै. कृष्णा मुचंडी यांनी जेव्हा ‘वार्ता’ हे द्विसाप्ताहिक सुरू केले तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी शहापूरकर वार्तामध्ये रूजू झाले. नंतर त्यांच्याबरोबरच ‘ज्वाला’ दिवाळी अंकाचे संपादनही त्यांनी केले.

१५ ऑगस्ट २००३ पासून पुन्हा साप्ताहिक ‘साम्यवादी’ सुरू झाले तेव्हा ते दै. तरूण भारतमध्ये संपादकीय विभागात होते. पण तरीही ‘साम्यवादी’च्या प्रत्येक अंकात त्यांनी लेखन केले. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या विषयातील विविधता. वैज्ञानिक घडामोडीपासून ते क्रिकेटपर्यंत आणि चित्रपटसृष्टीपासून ते राजकारणापर्यंत कोणताही विषय त्यांना वर्ज्य नाही. ‘साम्यवादी’च्या दिवाळी अंकाचे संपादन आणि प्रत्येक अंकात एक दीर्घ लेख त्यांनी लिहिलेले आहेत. अत्यंत सोपी भाषा, स्पष्ट विचार यामुळे त्यांच्या लिखाणाचा एक चाहता वर्ग आहे. ‘बेळगावचे कार्यकर्ते’ या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत. तसेच ‘आचार्य अत्रे : संयुक्त महाराष्ट्र व सीमाप्रश्न’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना त्यांनी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या स्थापनेमध्ये भाग घेतला. आज ते पत्रकार संघाची धुरा सांभाळत असून अध्यक्षपदी कार्यरत आहेत. पत्रकार संघाच्यावतीने बेळगावात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे २६ वे अधिवेशन भरविण्यात त्यांचा सहभाग होता. पत्रकार संघाची वास्तू असावी यासाठी ते प्रयत्नशील होते. आज बेळगावात पत्रकार संघाची स्वतःची वास्तू आहे. पत्रकार संघ स्थापन झाल्यापासून आजपर्यंत ते सलग कार्यकारिणीवर राहिले आहेत. पत्रकार संघ आणि जायंट्स ग्रुप यांच्यावतीने १९८८ साली बेळगावात स्वप्न सुंदरी हेमा मालिनी यांच्या ‘मीरा’ नृत्य नाट्य शोचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते संघाचे अध्यक्ष होते.

बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व कार्यवाह म्हणून बरीच वर्षे त्यांनी काम पाहिले. बेळगावात जेव्हा वाचनालयाच्यावतीने ७३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आले तेव्हा मुख्य कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले. याच साहित्य संमेलनात सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीबाबत ठराव मांडण्यात आला होता.
‘साम्यवादी’ चळवळीचा भाग म्हणून बेळगावात कामगार चळवळ, महिलांची चळवळ, विद्यार्थी चळवळ, शेतमजूरांची चळवळ अशा अनेक चळवळी झाल्या. वेळोवेळी त्यांची राज्यपातळीवरील अधिवेशने झाली. त्या सर्व अधिवेशनांना त्यांनी योगदान दिलेले आहे. बराच काळ त्यांनी दै. तरूण भारतच्या संपादकीय विभागात कार्य केले. पण त्याच काळात झालेल्या श्रमजीवींच्या चळवळीत भाग घेताना ते डगमगले नाहीत. आपल्या वैचारिक भूमिकेमुळे आपणाला नोकरीला मुकावे लागणार नाही ना ही चिंता त्यांना त्यांच्या स्विकारलेल्या कामापासून रोखू शकली नाही. त्यांच्या सहभागामुळे यशस्वी झालेला एक मोठा कार्यक्रम म्हणून गोवामुक्तीचा सुवर्ण महोत्सव बेळगावात साजरा झाला. त्याचा उल्लेख करता येईल. या दोन दिवसीय कार्यक्रमाचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले. कार्यक्रम होताच अल्पावधीतच त्यांनी गोवा सरकारकडे कार्यक्रमाचा हिशोबही सादर केला. चार वर्षापूर्वी बेळगावात प्रगतिशील लेखक संघाची स्थापना करून दरवर्षी साहित्य संमेलन भरविण्यात येते. यामध्येही त्यांनी भरीव योगदान दिलेले असून ते लेखक संघाचे कार्यवाह आहेत. प्रगतिशील लेखक संघाच्या जयपूर आणि जबलपूर येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी भाग घेतला होता.
कॉ. कृष्णा मेणसे यांच्या पुढाकाराने व ऍड. नागेश सातेरी यांच्या प्रयत्नाने बेळगावात बेळगाव सिटी मझदूर को-ऑप. क्रेडिट सोसायटीची स्थापना १९८२ साली करण्यात आली. सोसायटीच्या स्थापनेपासून ते संचालक पदावर आहेत. सध्या चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. त्याचप्रमाणे कॉ. कृष्णा मेणसे यांनी स्थापन केलेल्या कॉ. कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ या संस्थेतही ते उपाध्यक्ष पदावर आहेत. एवढी सर्व कामे करताना त्यांनी आपल्या कुटुंबाकडे अजिबात दुर्लक्ष केलेले नाही. आपले पालनपोषण केलेल्या मामा-मामी आणि आजीची त्यांच्या वृद्धापकाळात त्यांनी निरपेक्षपणे सेवा केली. आपल्या दोन मुलींना शिकविले. यातील स्नेहल ही बी. कॉम. झाली तर शिवांगी डॉक्टर झाली. दोन्ही मुली आपापल्या संसारात सुखी आहेत. कॉ. शहापूरकरांना खंबीर साथ लाभली ती त्यांच्या पत्नी कॉ. प्रभावतींची. कॉ. शहापूरकरांना एक भाऊ व तीन बहिणी. या सर्वांना वेळोवेळी शहापूरकरांचे मार्गदर्शन लाभत असते. कॉ. शहापूरकरांच्या कामाबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. कॉ. शहापूरकरांच्या कामाची नोंद घेवून त्यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा मराठा बँकेच्या सभागृहात साजरा झाला होता.

श्रमजीवी जनतेच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारा हा पत्रकार कार्यकर्ता आजही निवृत्त झालेला नाही. तो सतत काम करतानाच दिसतो. समाजात निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर आपली अशी डावी पुरोगामी भूमिका घेताना दिसतो. वेळ आलीच तर रस्त्यावर उतरून आंदोलनही करताना दिसतो. डाव्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्याने कसे असावे याचे जे मापदंड पूर्वीच्या नेत्यांनी तयार केले त्यानुसार ते आज मार्गक्रमण करताना दिसतात. त्यांना चांगले आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच सदिच्छा. कॉ. लाल सलाम.

– लोकमित्र

About Belgaum Varta

Check Also

म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *