
बेळगाव : महिलांवरील वाढते लैंगिक अत्याचार, शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींची होणारी छेडछाड, ड्रग्स विक्री अनियंत्रित, नाईट क्लबच्या वाढत्या प्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्री व गृहराज्यमंत्री यांना देण्यात येणार आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सदर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या निवेदनात देशभरात लहान मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचारप्रकरणी पोक्सो कायदा आणि लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर शाळा महाविद्यालय देखील महिलांसाठी सुरक्षित राहिलेली नाही त्यामुळे शैक्षणिक स्थळे सुरक्षित रहावेत यासाठी कठोर अंमलबजावणी व विशेष कायदा अमलात आणण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. लैंगिक गुन्ह्याशी संबंधित न्यायसंहिता कायदा देखील अमलात आणण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे बेळगावसह परिसरात अमली पदार्थांची खरेदी विक्री राजरोसपणे सुरू आहे. शाळा, महाविद्यालय वसतिगृहे अशा ठिकाणी हे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यामुळे तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येत आहे. त्यासाठी एनडीपीएस कायद्यान्वये विशेष आमली पदार्थविरोधी पथकाची स्थापना, गुप्त माहितीच्या आधारे छापे आणि दोषींवर तात्काळ आणि कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहरात मद्य विक्री आणि नाईट क्लब नियमबाह्यरित्या सुरू असल्यामुळे अशा ठिकाणी महिलांची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे सांगत अशा अनियंत्रित क्लबचा परवाना रद्द करावा. या परिसरात सीसीटीव्ही कार्यरत ठेवण्यात यावेत. त्याचप्रमाणे महिला सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस पडताळणी बंधनकारक करण्याची मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली. या मोर्चात श्रीराम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta