
बेळगाव : राकसकोप बस थांब्यापासून बिस्किट महादेव मंदिर मार्गे रामघाट रोडवरील बुडा कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था प्रशासनाच्या उदासीनतेचे दर्शन घडविणारी भिंतीपत्रके या रस्त्यावर ठिकठिकाणी लावण्यात आली होती. वारंवार मागणी करून देखील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरलेल्या प्रशासनास आव्हान देणारी भिंतीपत्रके काढण्यास मात्र प्रशासन तत्परतेने कार्यरत झाल्याचे आज बेळगावातील नागरिकांना पहावयास मिळाले. प्रशासनाच्या या कृतीमुळे सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी संतापजनक आश्चर्य व्यक्त केले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. सध्या उन्हाचे दिवस सुरू असल्यामुळे धुळीचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील पथदीप बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे देखील धोक्याचे बनले आहे. त्या रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहन चालकांमध्ये लहान मोठे अपघात घडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत त्याचप्रमाणे खड्डे व रस्त्यातून वाहन चालवल्यामुळे वाहनांचे देखील नुकसान होत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी देऊन देखील प्रशासनाने या रस्त्याकडे लक्ष दिलेले नाही त्यामुळे या रस्त्यालाही कदाचित नेत्यांची भेट हवी!, ‘व्हीआयपी भेट असेल तर रस्ता चमकेल’, अशा आशयाची भिंतीपत्रके सामाजिक कार्यकर्त्यांनी लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत विविध वृत्तपत्रातून तसेच विविध समाजमाध्यमांवर याबाबतचे वृत्त प्रसारित झाले होते. प्रशासनाच्या उदासीनतेवर बोट ठेवणारे हे वृत्त त्वरित चर्चेत आले त्यामुळे एरवी खडबडून जागे न होणारे प्रशासन सदर पत्रके भिंतीवरून काढण्यास आज मात्र खडबडून जागे झाले आणि तात्काळ भिंतीपत्रके भिंतीवरून काढून टाकण्यात आली. वारंवार मागणी करून देखील रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने शासनाच्या विरोधी फलक काढण्याची तत्परता दाखविली. प्रशासनाच्या या कृतीचा नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. सदर रस्ता हा कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो. कॅन्टोन्मेंट प्रशासन या रस्त्याच्या विकासासंदर्भात ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेकडे बोट दाखवते. महानगरपालिका आपली जबाबदारी झटकते अशा परिस्थितीत सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. संबंधित खात्याने या रस्त्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta