
बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित पिरनवाडी येथील कर्मवीर विद्यामंदिर हायस्कूलच्या सन २००१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व गुरुवंदना कार्यक्रम रविवारी १४ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.
“एक दिवस पुन्हा शाळेत जाऊया, लहान होऊया” या भावनेतून तब्बल ७० माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. यावेळी अनेक माजी शिक्षकही उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळा परिसरात प्रार्थना व राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर वर्गामध्ये माजी वर्गशिक्षकांनी सरस्वती पूजन करून हजेरी घेतली. जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षक–विद्यार्थी यांच्यात मनमोकळ्या गप्पा रंगल्या. विविध खेळ खेळत सर्वांनी शालेय जीवनाचा आनंद पुन्हा अनुभवला.
यानंतर कार्यक्रम राम मिनी गार्डन येथे स्थलांतरित झाला. येथे शिक्षकांचे भव्य स्वागत करून व्यासपीठावर आमंत्रण देण्यात आले. प्रारंभी स्वर्गवासी शिक्षक व मित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विद्यार्थिनींकडून स्वागतगीत सादर करण्यात आले.
अध्यक्षांची निवड झाल्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षकांचा परिचय व स्वागत रूपा उसूलकर यांनी केले.
कार्यक्रमात सध्या शाळेचे मुख्याध्यापक बी. आर. कडगावकर सर यांचा अध्यक्ष म्हणून प्रथम सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी शिक्षक मारुती माळवी, शट्टूप्पा मोरे, वासुदेव खनगावकर, अजित शंकरगौडा, मुदगॅपगोळ, यल्लाप्पा बांडगी तसेच शाळेचे मामा सुरेश चव्हाण यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणानंतर वैशाली सनदी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत धामणेकर यांनी केले.
या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला ८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा संच भेट देण्यात आला. तसेच प्राथमिक व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्वीट वाटप करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थ्यांपैकी सेवानिवृत्त सैनिक सागर भास्कर व गंगाराम पाटील, तसेच अनिल धामणेकर, पांडू पेडणेकर, शशिकांत धामणेकर, नितीन येळ्ळूरकर, परशराम राऊत व परशराम नौकुडकर यांचाही सत्कार करण्यात आला.
यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta