
बेळगाव : गरीब कुटुंबात जन्माला आलो. बालपणातच घरची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उच्चशिक्षित होता आले नाही. शिक्षण हातून सुटले की परत मिळत नाही. हे प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवावे. निरंतर शिकत राहण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असे प्रतिपादन, जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बोलताना केले.
कॅम्प येथील बी.के मॉडल हायस्कूलच्या शताब्दी समारोह सप्ताहात आज बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला, अभिनेते सचिन पिळगावकर यांच्यासह बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले, स्त्री ही पुरुषांपेक्षा नेहमीच सर्वार्थाने श्रेष्ठ आहे. त्यामुळे पालकांनी मुलींच्या शिक्षणाला अधिक महत्त्व द्यावे. माझे बालपण गरीब कुटुंबात व्यतीत झाले. वयाच्या चौथ्यावर्षी अभिनय केला. पाचव्या वर्षी बालकलाकार अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. वयाच्या सहाव्या वर्षी घरची जबाबदारी स्वीकारली. चित्रपटात कामे करू लागलो. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. मात्र त्यावेळी शिक्षकांनीच माझ्या शिक्षणासाठी मेहनत घेतली. प्रत्येकाच्या जीवनात शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले.
लोकांना चित्रपटसृष्टीचे आकर्षण दिसते. या क्षेत्रातील झगमगत्या दुनियेतील कष्ट परिश्रम दिसत नाहीत. लोकप्रियता अथवा प्रसिद्धीसाठीही परिश्रमाचे गरज असते. चित्रपटात काम करत असतानाच नेहमीच शिकत राहण्याचा प्रयत्न करत राहिलो. मीनाकुमार यांच्यामुळे उर्दू भाषा शिकता आली.भाषांवर माझे नेहमीच प्रेम राहिले. माणसाने नेहमीच शिकत राहायला हवे. वयाच्या अठराव्या वर्षी 1975 मध्ये शोले आणि गीत गाता चल या दोन चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. दोन्हीही चित्रपट तुफान लोकप्रिय ठरले. त्यानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. चित्रपट सृष्टीत यश मिळत राहिले. यश मिळवूनही काही वेळा ज्यादा शिकता आले नाही याची खंत वाटते.याचा विचार केलास प्रत्येकाने ज्या वयात योग्य आहे ते करत राहायला हवं. असे आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर शोले चित्रपटातील क्लायमॅक्स आणि त्या चित्रपटातील आपल्या मृत्यूच्या शूटिंगचा किस्सा सांगितला.
आमदार राजू शेठ यांनी आपल्या भाषणात, शाळेचा शतक महोत्सव ही सामान्य बाब नाही. या शाळेच्या स्थापनेवेळी संस्थापकांना कित्येक प्रकारच्या अडीअडचणींचा सामना करावा लागला असेल. हे पाहता शताब्दी वर्ष हे साधे काम नाही.बालपणीची मैत्री हीच खरी मैत्री असते. शिक्षक केवळ शिक्षण देत नसतात तर राष्ट्र उभारण्याचे कार्य करत असतात असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रारंभी अविनाश पोतदार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
Belgaum Varta Belgaum Varta