Friday , December 26 2025
Breaking News

येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी

Spread the love

 

येळ्ळूर : महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून खासदार धैर्यशील माने यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा व्यक्त करण्यात आला ब्रम्हलिंग मंदिरमध्ये येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने संघटना बळकटी संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत वरील ठराव करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. महादेव रामचंद्र मंगणाईक होते.
प्रारंभी प्रस्ताविकात शिवाजी कदम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत करून येळ्ळूर येथील समितीच्या कार्यकर्त्यांवर कर्नाटक सरकारने खोटे दावे दाखल केले आहेत त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता होईल असे सांगितले.
प्रकाश अष्टेकर यांनी, मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी आचार्य अत्रे, एस.एम. जोशी, बाळासाहेब ठाकरे, सेनापती बापट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदि मंडळीनी जीवाचे रान केले पण बेळगावचा सीमाप्रश्न तसाच लोंबकळत पडला. आमचे प्रश्न सोडवून घ्यायचे असतील तर समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकसंघ राहण्याचे आवाहन केले. अनिल हुंदरे यांनी, येळ्ळूरवाडी भागातील दिवंगत नेते कै. उमाजीराव तोपिनकट्टी, कै. आप्पासाहेब सायनेकर, कै. बाळाराम कंग्राळकर, कै. शंकर कदम, कै. हणमंत पाखरे, कै. सुब्राव पाटील, कै. हणमंत हुंदरे आदि नेत्यांच्या सीमालढ्यातील योगदानाबद्दल माहिती देवून वाडीभाग म. ए. समितीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली.
वामनराव पाटील यांनी येत्या 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सीमाप्रश्नाची सुनावणी आहे त्यामुळे मराठी भाषिकांची एकजूट असणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले.
राजू पावले, दुद्दापा बागेवाडी, प्रकाश पाटील, बी. एन. मजुकर इत्यादींची समितीची संघटना बळकट करण्याविषयी भाषणे झाली.
या बैठकीत मराठी माणसांच्या मतावर निवडून आलेले खासदार जगदीश शेट्टर हे महाराष्ट्राने फेटाळून लावलेला महाजन अहवाल अंतिम असल्याचे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे येळ्ळूर म. ए. समिती त्यांचा जाहीर निषेध करीत आहे. असाही ठराव करण्यात.
बंडू शेषराव पाटील यांनी 21 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीत सीमाप्रश्नाला गती मिळावी, अशी ब्रम्हलिंग देवासमोर गाऱ्हाणे घातले.
या बैठकीला बाळासाहेब पावले, दौलत पाटील, शिवाज सायनेकर, आनंद कंग्राळकर, कृष्णा बिजगरकर, बाळकृष्ण पाटील, नंदकुमार पाटील, रमेश मो. धामणेकर, विनोद पाखरे, कृष्णा शहापूरकर, सतीश देसुरकर, सुरज गोरल, बाळकृष्ण धामणेकर, पप्पू कुंडेकर, यल्लापा संभाजीचे, शिवाजी पाखरे, विनायक पाटील, संजय हुंदरे, यल्लापा संभाजीचे, भाऊ पाखरे, अनंत पाटील, बाबू कंग्राळकर, संजय मासेकर, विनोद हुंदरे, सुरज पावले आदि शेकडो कार्यकर्ते हजर होते.
पुढील बैठक सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी सिद्धेश्वर मंदिर येथे आयोजित केली आहे.
येळ्ळूर म. ए. समितीच्या विभागवार बैठकीना गावातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या बैठकीला शेकडो कार्यकर्ते हजर होते.
शेवटी रामा पाखरे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

…तर मग मला बेळगावला येताना का रोखले नाही? : ज्येष्ठ विधीतज्ञ उज्वल निकम यांचा सवाल

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्रातील नेते आणि लोकप्रतिनिधींना बेळगाव जिल्ह्यात येण्यापासून रोखण्यात येत असेल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *