
बेळगाव : सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळ संघाच्या कवींची निवड झाल्याने साहित्यप्रेमी व कवी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मराठी साहित्याच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि शतकपूर्व परंपरा लाभलेल्या या महत्त्वपूर्ण संमेलनात बेळगावातील कवी सहभागी होणार असल्याने ही बाब विशेष अभिमानास्पद मानली जात आहे.

दि. 1 ते 4 जानेवारी दरम्यान सातारा येथे हे साहित्य संमेलन पार पडणार असून शनिवारी (दि. 3 जानेवारी) दुपारी आयोजित कवी कट्टा कविसंमेलनात शब्दगंध कवी मंडळ संघाचे कवी आपल्या कविता रसिकांसमोर सादर करणार आहेत.
या कविसंमेलनासाठी कडोली येथील ज्येष्ठ कवी व शब्दगंध कवी मंडळ संघाचे माजी अध्यक्ष बसवंत शहापूरकर, शब्दगंधचे सचिव कवी सुधाकर गावडे, कवी चंद्रशेखर गायकवाड तसेच कुद्रेमानी येथील कवी शिवाजी शिंदे यांची निवड झाली आहे. हे सर्व कवी आपल्या सशक्त शब्दशैली, सामाजिक जाणिवा आणि साहित्यिक योगदानासाठी परिचित आहेत.
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे शतकपूर्व साहित्य संमेलन म्हणून विशेष महत्त्वाचे मानले जात असून, अशा ऐतिहासिक संमेलनात बेळगावातील कवींचा सहभाग हा संपूर्ण बेळगाव जिल्ह्यासाठी गौरवास्पद ठरत आहे. या निवडीमुळे बेळगावच्या साहित्यिक परंपरेचा राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटणार आहे.
शब्दगंध कवी मंडळ संघाच्या वतीने निवड झालेल्या सर्व कवींवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कवितांना साताऱ्यातील रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास साहित्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta