वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे कारचालकाचा जीव बचावला
बेळगाव : मंगळवारी दुपारी क्लब रोड येथे घडलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावरील चाकू हल्ला प्रकरणात चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे कार चालकाचा जीव वाचला असल्याचे समजते.
जखमी बसवंत याचा मित्र मदन याने दिलेल्या चौघांजणांविरोधात फिर्याद दिल्याने हल्लेखोरांची नावे समोर आली. आरोपी मोनाप्पा आणि संपत यांनी दिलेल्या चिथावणीवरून शिवय्या आणि मितेशने बसवंतवर हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्या चौघांनाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकारांना दिली.
कालच्या घटनेत चालकाचा जीव वाचवणाऱ्या आयपीएस अधिकारी रवींद्र गडादी यांनी यासंदर्भात माध्यमंशी बोलताना सांगितले की, बेळगाव शहरात माझ्या ऑफिसमधून जेवणासाठी घरी जात असताना, दुपारी २:१५ च्या सुमारास ईफा हॉटेलपासून ५०-६० मीटर अंतरावर रस्त्यावर दोन लोक एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करत होते. मी आमच्या गाडीच्या चालकाला गाडी थांबवायला सांगून तात्काळ त्यांच्या दिशेने धावलो, ते गुन्हेगार माझ्याकडेच पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात खूप द्वेष दिसत होता. पोलीस गाडी, एका पोलीस अधिकाऱ्यासमोर उभे राहून, कसलीही पर्वा न करता, त्यांनी खाली पडलेल्या त्या माणसावर चाकूने वार केले.
हा प्रकार पाहणाऱ्या लोकांना मी मदतीसाठी हाक मारली, पण कोणीही पुढे आले नाही. मी तात्काळ माझ्या ड्रायव्हरला पिस्तूल (बंदूक) आणायला सांगितले. ते ऐकल्यानंतर गुन्हेगार तिथून पळून गेले. मग त्याला गाडीत घालून विजया हॉस्पिटलमध्ये पाठवले आणि मी त्याच्यामागे गेलो. नंतर त्याच्याबद्दल चौकशी केल्यावर, तो मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा मृणाल हेब्बाळकर यांचा कारचालक असल्याचे समजले.
एक दुःखद गोष्ट म्हणजे, ही घटना घडत असताना सुमारे १५-२० लोक हा प्रकार पाहत होते. जर त्यावेळी कोणी मदत केली असती, तर त्या दोन्ही गुन्हेगारांना पकडून संबंधित पोलिसांच्या ताब्यात देता आले असते आणि एक चांगला नागरिक म्हणून कर्तव्य बजावता आले असते. अशी खंत ही गडादी यांनी व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta