बेळगाव : सोमवार दिनांक १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. युवा समितीचे समाजमाध्यम प्रमुख साईनाथ शिरोडकर यांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि चिटणीस प्रतीक पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी बोलताना प्रतीक पाटील म्हणाले
राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी रोजी सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या सिंदखेडराजा येथे झाला. ३५० वर्षांच्या काळ्याकुट्ट अंधारात एक स्वराज्याची पणती तेवयाला लागली. आणि ह्याच पणतीने स्वराज्याच्या सूर्याला प्रकाश दिला उमेद दिली ती स्वराज्य स्थापनेची, स्वराज्य म्हणजेच स्वकीयांच राज्य. अवघ्या मुलुखातील रयतेला केंद्रस्थानी ठेऊन रयतेच राज्य निर्माण झालं. हिंदवी स्वराज्य स्थापन झालं ते ह्याच माऊलीच्या दूरदृष्टीने.
जसं आपलं स्वराज्य सर्वसामान्य जनतेचे म्हणजेच सर्वसमावेशक होते तोच संदेश संपूर्ण जगाला स्वामी विवेकानंद यांनी दिला. १८९३ साली झालेल्या जागतिक संमेलनात व्यासपीठावर उभे राहून त्यांनी जेव्हा “माझ्या प्रिय बंधू भगिनींनो” म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली, तेव्हाच आपला भारत देश हा सर्व घटकांना आपल्यात सामावून घेण्यातच प्राथमिकता ठेवतो, आणि हा देश सर्वसमावेशक आहे हे जगाला पटवून दिले. माऊलींच्या “हे विश्वाची माझे घर” ह्या उक्ती प्रमाणे आपल्या देशाची हा माणुसकीचे आद्य समर्थक अशी जगात ओळख आहे. भारत देश हा कायम निरपेक्ष राहत सर्व जगात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे ह्यासाठी कायम प्रयत्नशील राहिलेला आहे. पण सध्याच्या काही काळात ही आपली प्रतिमा काहीशी निराळी झाल्याचे आपल्याला दिसून येते, पण आपल्या सर्वांनी आपण कायम “वसुधैव कुटुंबकम” मानणारे आहोत हे जगाला पुन्हा एकदा पटवून दिले पाहिजे अस मत व्यक्त केले.
यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, आनंद पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta