बेळगाव : पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथे काल दि. 31 जानेवारी रोजी पार पडलेल्या बी.एस.एफ. (सीमा सुरक्षा दल) शपथग्रहण समारंभात बेळगावच्या कन्येने घवघवीत यश संपादन करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
मूळची खानापूर तालुक्यातील ओलमणी गावची आणि सध्या शाहूनगर, कंग्राळी (बी.के.) येथे वास्तव्यास असलेली कु. रोशनी वसंत मुळीक हिला या शपथग्रहण समारंभात तब्बल 400 मुला-मुलींमध्ये ‘परेड कमांडर’ म्हणून नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाला.
विशेष बाब म्हणजे रोशनीने केवळ परेडचे नेतृत्वच केले नाही, तर तिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ‘बेस्ट परेड कमांडर’, ‘बेस्ट ड्रिल’ हे मानाचे पुरस्कारही पटकावले. 400 प्रशिक्षणार्थींमध्ये रोशनीने आपल्या शिस्तबद्ध परेडमधून नारी शक्तीचा प्रभावी संदेश दिला आणि उपस्थित अधिकारी व मान्यवरांची विशेष दाद मिळवली.
रोशनी ही शाहूनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैष्णवी वसंत मुळीक यांची कन्या असून, तिच्या या यशाबद्दल खानापूर तालुका व संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रोशनीच्या या यशामुळे अनेक तरुणींना देशसेवेची प्रेरणा मिळाली असून, ती आज बेळगावच्या युवतींसाठी एक आदर्श प्रेरणास्थान ठरत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta