Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतन आयोजित पालक संवाद व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पालक संवाद व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दिनांक 29 व 30 जानेवारी रोजी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोळकर व प्रसिद्ध सायबर पत्रकार डॉ. मुक्ता चैतन्य यांचे विवेकी पालकत्व व आधुनिक जगातील डिजिटल आव्हाने या विषयावरची व्याख्याने व चर्चासत्रे शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. याच बरोबर विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या साठी वेगवेगळ्या समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमांना पालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुभाष ओऊळकर उपस्थित होते.

व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, सचिव विक्रम पाटील, सहसचिव पी. पी. बेळगावकर, खजिनदार एन. बी. खांडेकर, विश्वस्त डॉक्टर विजय देसाई, प्रा. सुरेश पाटील उपस्थित होते. पहिल्या दिवशी डॉ. हमीद दाभोळकर यांनी विवेकी पालकत्व या विषयावर आपली मांडणी केली. पालकांनी विद्यार्थ्यांशी कशाप्रकारे सुसंवाद ठेवावा, सध्या बदलत चाललेली जीवनशैली, माध्यमांचा होणारा विद्यार्थ्यांवर परिणाम, मुलांची मानसिकता, मन आणि मेंदू यांचा विकास या सर्व बाबींवर मार्गदर्शन केले. मुलांनी व पालकांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या समस्या जाणून घेतल्या. डॉ. हमीद दाभोळकर यांची प्रकट मुलाखत निला आपटे व इंद्रजित मोरे यांनी घेतली. यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्याच्या प्रसिद्ध सायबर पत्रकार व समुपदेशक मुक्ता चैतन्य यांनी आधुनिक जगातील डिजिटल आव्हाने या विषयावर आपली मांडणी केली. आपल्या हातात असणारा मोबाईल सध्या किती धोकादायक आहे, याद्वारे आपली कोण कोणत्या प्रकारे फसवणूक होऊ शकते, मोबाईलचा मर्यादित वापर कसा करावा, स्क्रीन टाईम किती असावा, सायबर गुन्हेगारी म्हणजे काय? या सर्व विषयांवर मार्गदर्शन केले. दोन्ही दिवसांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी पालक व शिक्षकांचे उत्तम समुपदेशन झाले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बी. जी. पाटील, एन. सी. उडकेकर, शिक्षण समन्वयक नीला आपटे, सविता पवार, गौरी चौगुले, सीमा कंग्राळकर यांनी परिश्रम घेतले. रुपाली हळदणकर, स्नेहल बेळगावकर, स्नेहल पोटे, मंजुषा पाटील, इंद्रजीत मोरे व प्रसाद सावंत यांनी सुत्रसंचलनाची जबाबदारी पार पाडली. आभार मुक्ता अलगोंडी, धीरज राजपूत यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *