चंदगड : देवरवाडी ग्रामपंचायत आणि प्रिन्स पाईप कंपनी, देवरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीच्या काळात देवरवाडी गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक साहित्य कीट वाटप करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येकी एका कुटुंबासाठी ५ किलो गहू पीठ,५ किलो तांदूळ, १ किलो तेल, १ किलो साखर, साबण, टूथपेस्ट आणि मास्क याचे वाटप करण्यात आले. उर्वरित जीवनावश्यक साहित्य कीट पाटणे फाटा येथील प्रतिकूल परिस्थितीत ही जीवन जगणाऱ्या, उपेक्षित, वंचित अशा लाड लक्ष्मी, डोंबारी समाज यांना मानवतेच्या व सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच गोर-गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे कर्मयोगी आनंदराव यांच्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले.
देवरवाडी ग्रामपंचायतीच्या उच्च विद्याविभूषित नूतन महिला सरपंच श्रीमती गीतांजली सुतार यांनी सांगितले की, एक मेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ याप्रमाणे समाजाचा एक भाग म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आणि तो यशस्वी केला. इतरांनीही आपल्यापरिने शक्य तेवढी समाजाची सेवा करावी. यावेळी देवरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक कांबळे, संगणक परिचालक विजय भांदुर्गे, प्रा. नागेंद्र जाधव आदी उपस्थित होते.