शिवाळे (ता. चंदगड) येथील ॐकार नवचैतन्य कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 10 ऑक्टोबर रोजी “होम मिनिस्टर” स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या सन्मानार्थ पैठणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत संचिता संतोष गावडे यांनी विजेतेपद पटकावले, तर संगिता भैरू पाटील उपविजेती ठरली.
संचिता संतोष गावडे यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. हे बक्षीस लक्ष्मी भागोजी वांद्रे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच उपविजेती सौ. संगिता भैरू पाटील यांना कांजिवरम साडीचे बक्षीस देण्यात आले, हे बक्षीस लता रामचंद्र पाटील (उद्घाटक) आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी भागोजी वांद्रे होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन लता रामचंद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. व्यासपीठावर पोलिस पाटील सौ. शुभांगी शांताराम पाटील, वैदही वैजू गावडे, वैशाली नारायण पाटील, नंदिनी परशराम फडके आणि अश्विनी अशोक गावडे यांचे स्वागत करण्यात आले.
स्पर्धेदरम्यान महिलांसाठी तळ्यात-मळ्यात, लिंबू-चमचा, संगीत खुर्ची, प्लास्टिक ग्लास मनोरा रचना, स्टॉ खोप्यात घालणे, फुगे फोडणे, केळी खाणे, पाणी पिणे आणि पिठातील चेंडू तोंडाने काढणे असे विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये महिलांनी उत्साहात सहभाग घेतला. या खेळांचे सूत्रसंचालन संजय साबळे आणि रवी पाटील यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने करत महिलांचे प्रबोधनही केले.
प्रत्येक खेळातील विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली, तसेच सहभागी सर्व महिलांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष नारायण पाटील, सचिव महादेव पाटील, युवराज वांद्रे, जोतिबा वांद्रे, डेप्युटी सरपंच संतोष गावडे, ग्राम पंचायत सदस्य परशराम फडके, अनंत गावडे, संदिप गावडे आणि संजय गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.