Sunday , April 20 2025
Breaking News

यमगर्णीत सामाजिक कार्यकर्त्याचा खून

Spread the love

 

सौरभच्या फसवणुकीचा राग; हिंडलगा कारागृहात रवानगी

निपाणी(वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी हद्दीमधील सहारा हॉटेल जवळ एका सामाजिक कार्यकर्त्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. गुरुवारी (ता.१०) रात्री दहा वाजण्याचा सुमारास ही घटना घडली आहे. संतोष विश्वनाथ चव्हाण (वय ४० रा. यमगर्णी) असे खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी सौरभ वसंत कोरवी (वय २६ रा. यमगर्णी) याला बसवेश्वर चौक पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याला निपाणी विशेष न्यायालयासमोर हजर करून हिंडलगा कारागरात रवानगी करण्यात आली. निपाणी शहरात गेल्या आठवड्यात युवकाचा खून झाल्यानंतर लागलीच ही घटना नवव्या दिवशी घडल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, मयत संतोष चव्हाण हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते. तर संशयित आरोपी सौरभ कोरवी हा खाजगी नोकरी करीत होता. दरम्यान सौरभ याने अनेक लोकांची फसवणूक चालवली होती. त्याच्या फसवणुकीला बळी पडू नका, असे संतोष चव्हाण यांनी काही जणांना सांगितल्याचा राग मनात धरुन सौरभ याने संतोषला चाकूने भोसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

मयत व आरोपी आणि त्यांच्यासह त्यांचे मित्र मंडळी सहारा हॉटेल जवळ काही कामानिमित्त गेले होते. उर्वरित मित्र इतरत्र चर्चा करत असताना हे दोघे बाजूला जाऊन चर्चा करत असताना हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी अवस्थेत संतोषला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी संतोषला मयत झाल्याचे घोषित केले. पोलिसांनी महात्मा गांधी रुग्णालयात भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद पोलीस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार
बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांच्यासहपोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने संशयित आरोपीला ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याची कसून चौकशी सुरु होती. गुरुवारी रात्री अचानकपणे खून झाल्याने परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मयत संतोष याच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपी सौरभ कोरवी याच्या विरोधात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सीपीआय बी. एस. तळवार हे करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

चांद शिरदवाड येथे १४ पासून पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन

Spread the love  डॉ. अविनाश पाटील; ७ दिवसात विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *