पुणे (ज्ञानेश्वर पाटील) : पुण्यातील आर. के. बिर्याणीच्या मालकाकडून जबर मारहाण व धमकी दिल्याने हॉटेल कामगार प्रभाकर कांबळे यांनी घाबरून आपल्या राहत्या घरी फास लाऊन आत्महत्या केली. ही दुःखद घटना घडल्याने चंदगड तालुक्यासह पुणे येथील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
गेली ४ वर्षे प्रभाकर कांबळे हे आर. के. बिर्याणी हॉटेलमध्ये काम करत होते. घरी आई आजारी असल्यामुळे ते आपल्या कानूर या गावी गेले होते. त्यानंतर पुण्यामध्ये येऊन दोन दिवसही न होताच कांबळे यांना हॉटेल मालक परदेशी व मॅनेजर यांनी कामावर का आला नाही? म्हणून शिवीगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या भीतीपोटी प्रभाकर कांबळे यांनी राहत्या घरी भर दुपारी २ वाजायच्या सुमारास फास लाऊन आत्महत्या केली. त्यामुळे सदर आरोपीवर गुन्हा नोंद व्हावा यासाठी त्यांच्या पत्नी प्रभावती कांबळे यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्थानकामध्ये तक्रार दिली आहे.
चंदगड तालुक्यातील कित्येक युवावर्ग हा हॉटेल व्यवसायाकडे काम करत आहे. आपला उदरनिर्वाह करून आपले घर चालवणारे हे हॉटेल कामगारच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य लोकांची काय अवस्था असेल? त्यामुळे एकंदरीत सदर दोषी असणाऱ्या आरोपीवर कारवाई व्हावी अशी मागणी युवावर्ग व हॉटेल कामगारांकडून होत आहे.