पारगड परिसराची अधिकार्यांकडून पाहणी, चंदगड पत्रकार संघाचा पुढाकार
चंदगड (श्रीकांत पाटील) : चंदगड मधील ऐतिहासिक गडकोट, नैसर्गिक साधन संपत्ती, धार्मिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सक्षम आहेत. त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची गरज असून तालुक्यातील अशा ठिकाणांची पाहणी करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली. चंदगडचे कोर्टाचे दिवाणी न्यायाधीश ए. सी. बिराजदार व तहसीलदार विनोद रणवरे यांच्यासमवेत किल्ले पारगड परिसर पाहणी दौरा प्रसंगी बोलत होते.
पारगडवरील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून अधिकार्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर श्री भगवती देवीचे दर्शन घेऊन किल्ल्यावरील बुरुज, तटबंदी, गडावरील चार तलाव, विहिरी, ऐतिहासिक बांधकामे, हनुमान व महादेव मंदिर, गडाच्या पायर्या, घोडे दरवाजा कडील धोकादायक वळण रस्ता आदींची पाहणी केली. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. पारगड जनकल्याण तसेच वन समितीचे सदस्य प्रकाश चिरमुरे व रघुवीर शेलार यांनी स्वागत करून पारगड वाशी यांच्या समस्या अधिकार्यांसमोर मांडल्या. प्रास्ताविक श्रीकांत पाटील यांनी केले. प्रवीण चिरमुरे यांनी ’पारगड हेरिटेज रन’ या 29 व 30 जानेवारी रोजी होणार्या मॅरेथॉन स्पर्धेची माहिती देऊन शासकीय स्तरावरून स्पर्धेसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रांताधिकारी वाघमोडे यांनी पारगड बरोबरच दुर्गम नामखोल व मिरवेल येथील ग्रामस्थांसाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना न्यायाधीश बिराजदार म्हणाले शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडावर येण्याचे भाग्य आपल्याला लाभले. गड संवर्धन, ग्रामस्थ व पर्यटकांसाठी बारमाही मुबलक पाणीपुरवठा, गडावरील रस्त्यांसाठी महाराष्ट्र शासन तसेच अधिकार्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
पारगडसह रामघाट, वाघोत्रे नजीकचे कण्वेश्वर मंदिर व परिसर तसेच तिलारी नगर परिसरात ग्रीन व्हॅलीच्या पश्चिमेकडील दरीतील धोकादायक ’रातोबा’ धबधब्यापर्यंत जाऊन पाहणी केली. यावेळी चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सचिव चेतन शेरेगार, संस्थापक अनिल डफळे, संपादक संपत पाटील, लोकशाही न्यूज नंदकिशोर गावडे व सदस्य, मंडलाधिकारी आप्पासाहेब जीनराळे, तलाठी श्रीकांत कापसे, ओमकार नाईक व तेजस्विनी पाटील, ग्रामसेवक संतोष तांबडे, सरपंच संतोष पवार, अंकुश गावडे, विद्याधर बाणे, गोविंद कांबळे आदींची उपस्थिती होती.
शासनाकडे अहवाल सादर करणार!
रविवार दि. 26 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या पाहणी दौर्यानंतर दुसर्या टप्प्यात चंदगड तालुक्यातील कलानिधी गड, गंधर्वगड, महिपाळगड व श्री वैजनाथ तीर्थक्षेत्र, स्वप्नवेल पॉईंट, माऊली मंदिर व कोदाळी परिसर व अन्य महत्त्वाची स्थळे तसेच गडहिंग्लजमधील सामानगड किल्ला, प्रताप्राव गुजर स्मारक आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणीनंतर एकत्रित अहवाल शासनाकडे पाठवणार असल्याचे शेवटी प्रांताधिकारी वाघमोडे यांनी शेवटी सांगितले.