तिघे जण गंभीर जखमी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड (ता. चंदगड) येथे घराचे बांधकाम सुरू असताना कॉलमची सळी उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला चिकटल्याने शॉक लागून २२ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ बेळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची चंदगड पोलिसात नोंद करण्यात आली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
या दुर्घटनेत संदीप मल्लाप्पा हुंद्रे (वय 22) हा जागीच ठार झाला असून नारायण चोफडे (वय 20 रा. बेकिनकेरे), कृष्णा भोगण (वय 25 रा. बेकिनकेरे) व प्रथमेश बाळू घोडके (वय 16 रा. कोवाड ) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज कोवाड येथे ताम्रपर्णी नदिकाठावर बाळू घोडके यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे कॉलम वर उचलले जात होते. त्यावेळी लोखंडी कॉलमच्या सळ्यांचा वरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांना स्पर्श झाला. त्यामुळे बसलेल्या जोरदार विद्युत धक्क्याने संदीप मल्लाप्पा हुंद्रे (रा. बेकिनेरे, ता. जि. बेळगाव) हा कामगार उडून खाली पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तिघे यांना देखील जोराचा झटका बसला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. उच्च विजप्रवाह आणि गंभीर भाजल्याने त्यांना तत्काळ बेळगांव येथे हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. तर संदीप हुंद्रे याचा मृतदेह शविच्छेदनासाठी चंदगड येथे पाठवण्यात आल्याचे समजते. या घटनेची चंदगड पोलिसात नोंद झाली असून या प्रकरणाचा पुढील तपास कोवाड व चंदगड पोलीस करत आहेत.