चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहर परिसरातील दूधगंगा नदीला आलेल्या महापूर क्षेत्रातील अनेक पशुधारक व दूध उत्पादक शेतकरी गेल्या 17 दिवसापासून मोठ्या पावसात भिजत उघड्यावर आहेत. त्या पूरग्रस्त पशुधारकांना पशुसाठी चारा, पाणी, निवारा आणि वैद्यकीय सुविधा कोणत्याही प्रकारच्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या पशुधारक शेतकऱ्यांनी आज सदलगा शहरातील नाड कचेरी येथे जाऊन ग्राम प्रशासन अधिकारी श्री. नीलकंठ खाडे यांच्यामार्फत माननीय तहसीलदारांना आपले मागण्यांचे निवेदन मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी नगराध्यक्ष श्री. अभिजीत पाटील यांनी आपल्या सर्व पशुधारक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समवेत दिले. आणि लवकरात लवकर उघड्यावर असलेल्या जनावरांना निवारा, चारा, पाणी आणि औषधोपचार मिळावा यासाठी आग्रही मागणी केली. अंदाजे तीनशेवर जनावरे आणि 88 पशुधारक कुटुंबे उघड्यावर आहेत. आज 17 दिवस झाले महापुराची गंभीर परिस्थिती असताना या सर्वसामान्य शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांच्या स्थळांना कोणीच शासकीय म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा यांनी भेट दिली नाही याची खंत या लोकांनी या ठिकाणी आवर्जून व्यक्त केली. या समस्याग्रस्त पशुधरक पूरग्रस्तांमध्ये अभिजीत पाटील, राजू अकिवाटे, इमाम मकानदार, प्रकाश चंदगडे, संजू हनबर, विनोद देसाई, विनय पाटील, गंगाधर मर्जके, दत्ता तपकिरे इत्यादी पशुधारकासह अनेक पूर बाधित क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.