बेळगाव : जिल्ह्यात २ दिवसांत ब्लॅक फंगसचे १७ नवे रुग्ण आढळून आले होते. आजवर त्यांची एकूण संख्या ८७ झाली आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही मुलामध्ये अद्याप ब्लॅक फंगसची लक्षणे आढळून आलेली नाहीत असे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
बेळगावात मंगळवारी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले की, बीम्स इस्पितळात ब्लॅक फंगसच्या ४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी १० रुग्णांवर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. याचप्रकारे ६ खासगी इस्पितळांत ३८ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ब्लॅक फंगसच्या रुग्णांना समर्पक प्रमाणात औषधे पुरवण्यात येत आहेत. येत्या २ दिवसांत औषधांचा आणखी साठा जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे.
बेळगाव जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह दर शेकडा ११ इतका आहे. २४ मेपासून गाव-गावांत रॅपिड टेस्ट करण्यात येत असून, आजवर ८०० खेड्यांत या टेस्ट केल्या आहेत. रॅपिड अँटीजेन टेस्टमुळे व्यक्ती कोरोनाबाधित आहे व नाही हे लगेचच स्पष्ट होते. त्यामुळे लवकर उपचार करण्यास आणि बळींची संख्या रोखण्यास मदत होत आहे. या टेस्ट करण्यासाठी जिल्ह्यात १३५ पथकांची रचना करण्यात आली आहे. सर्व खेड्यांत कोरोनाबाबत जागृती करण्यात येत असून मी स्वतः ८ खेड्याना भेट दिली आहे असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आजवर १२०० कोरोना रुग्णानी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या सुमारे ६०० बाधित तेथे उपचार घेत आहेत. रुग्ण सेंटरमध्ये दाखल झाल्यास त्याचे कुटुंबीय सुरक्षित राहू शकतात. इस्पितळांतून सध्या ३०० रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या उपचारांचा खर्च सरकार भरणार आहे. कोरोना नियंत्रणात जे चांगले काम करत नाहीत अशांवर कारवाई करण्यात येत आहे. जे चांगले काम करत नाहीत असे लोक आम्हाला नकोतच असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
एकंदर, कोरोना रोखण्यासाठी आणि बाधितांवर उपचारांची सर्व व्यवस्था बेळगाव जिल्हा प्रशासनाने केली असल्याचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सांगितले.