गडहिंग्लज : गडहिंग्लज-वडरगे रोड साई कॉलनी तसेच नवनाथ मठी परिसरात बस थांबा नसल्यामुळे पालकवर्गाची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. गडहिंग्लज शहरालगत असलेल्या वडरगे रोड येथील पालकांनी तसेच गर्दे नगर, नवनाथ मठी रोड, मेंडुले वसाहत, के.डी. सी. कॉलनी या कॉलनीमधील रहिवासी नवनाथ मठी रोडच्या कॉर्नरवर पालक आणि विद्यार्थी शाळेच्या बसची वाट पाहत थांबलेले असतात. वडरगे गावाकडून गडहिंग्लज शहराकडे येणारा नवनाथ मठी मेन रोडवरील कॉर्नर हा अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून वाहने प्रचंड वेगाने ये-जा करत असतात. या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा वेगमर्यादेचा किंवा पुढे वळण असल्याचा फलक लावलेला नाही किंवा रस्त्यावर गतिरोधक देखील नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थी बससाठी थांबलेले असताना किंवा रस्ता ओलांडत असताना जीव मुठीत घेऊन जावे लागते.
सदर बस थांब्यावर न्यू होरायझन स्कूल, साई इंटरनॅशनल स्कूल, क्रिएटिव्ह स्कूल अश्या अनेक शाळांचे विद्यार्थी बससाठी नेहमी थांबलेले असतात त्यामुळे या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक आणि बस थांबा उपलब्ध करून देण्यात यावा. त्याचप्रमाणे वडरगे – गडहिंग्लज रस्ता हा रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्यावर एक बस थांबा आणि वाहतुकीची नियमावली करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी गडहिंग्लज नगरपालिकेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सौ. भारती बाजीराव शिंदे, सौ. भाग्यश्री सचिन कोगनोळी, मनीषा कृष्णात रानमाळे, जॉयसी मोटेरो, कौशल्या भोसले, राथी पवार, कीर्ती गायकवाड, योगिता देसाई, सुप्रिया देसाई, पूजा सावंत, रेणुका बंबरगेकर, सरिता येसरे, आरती संजय शिंदे, श्रीमती अलका आनंदा भारती, सौ. अनुराधा लांबोरे, विशाखा आनंदा पाटील, सुंदरा व्हरांबळे, सीमा मांगले, राजश्री कदम, दिपाली सुतार, ऋग्वेदा संदीप झेंडे, सुनीता घेवडे, आरिफा ठगरी, अनिता शिंदे आदी महिला वर्ग उपस्थित होत्या.