गडहिंग्लज : सीमालढा चळवळीतील अत्यंत धडाडीचा लढवय्या नेता, चळवळीत अग्रणी राहिलेले पहिले सत्याग्रही, ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना येथील महात्मा गांधी विचार मंच, समाजवादी प्रबोधिनी, अनिंस शाखा गडहिंग्लज, राष्ट्रसेवादल इत्यादी पुरोगामी चळवळींच्यावतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. गडहिंग्लज येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
कॉम्रेड मेणसे यांचे सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी वयाच्या 97 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. कामगार व पुरोगामी चळवळीमध्ये सारं आयुष्य अर्पण करणारा हा महान योद्धा काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे पुरोगामी सामाजिक चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श व त्यांचा विचार पुढे नेणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल अशा भावना अनेक कार्यकर्त्यांनी या शोक सभेत व्यक्त केल्या. 2 ऑक्टोबर 2024 रोजी कॉम्रेड मेणसे यांना “म. गांधी विचार मंच” गडहिंग्लजतर्फे ” महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार” देऊन गौरविले होते. त्याचे स्मरण करून कॉम्रेड मेणसे यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीची फार मोठी हानी झाली असल्याचे मत प्राचार्य कल्याणराव पुजारी यांनी व्यक्त केले. या शोकसभेत प्रा. सुनील शिंत्रे, प्रा. सुभाष कोरे, प्रा. शिवाजीराव होडगे, प्रा. साताप्पा कांबळे, प्रा. आप्पासाहेब कमलाकर, बाळासाहेब मुल्ला, गणपतराव पाटोळे, प्रकाश कांबळे, प्रा. अरविंद बार्देसकर, टी.पी. पाटील यांचीही भाषणे झाली. या शोक सभेसाठी प्रा.प्रकाश भोईटे, एम. के. सुतार, प्रा. अनिल उंदरे, सुरेश थरकार, ईश्वर दावणे यांच्यासह विविध चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शोकसभेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार एम.के. सुतार यांनी व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta