बेळगाव : १९८६च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समिती आणि अन्य संघटनांच्या वतीने मंगळवारी अभिवादन करण्यात आले.
बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात मंगळवारी सकाळी १९८६च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांच्या त्यागाचे समरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नी कटिबद्ध व्हा असे आवाहन यावेळी सीमावासीयांना करण्यात आले. कोरोनाचे संकट असल्याने सामाजिक अंतर पाळून हा हुतात्मा दिन पाळण्यात आला. सीमाप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने शिक्षणात कन्नडसक्ती केल्याच्या विरोधात १ जून १९८६ रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात कन्नडसक्ती विरोधात भव्य आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात ९ जण ठार झाले. त्यांच्या हौतात्म्याची आठवण म्हणून म. ए. समितीतर्फे दरवर्षी १ जूनला सीमाभागात हुतात्मा दिन पाळण्यात येतो. त्याचप्रमाणे आज हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, सुनील बाळेकुंद्री आदींनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, कन्नडसक्तीला विरोध करून १ जून १९८६ रोजी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात अभूतपूर्व आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ९जण हुतात्मा झाले. आजही कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय केला जातो. सध्या सीमापृष्ठ सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. तेथे आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युवा नेते शुभम शेळके म्हणाले, बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट करावे यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांचे स्वप्न नक्कीच लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी आम्ही अथक लढा देत आहोत.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, एल. आय. पाटील, प्रकाश मरगाळे, किरण गावडे, नेताजी जाधव, मदन बामणे, सरस्वती पाटील, सुरज कणबरकर, ऍड. सुधीर चव्हाण, रामचंद्र कुद्रेमनीकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.