नवी दिल्ली : झारखंडमध्ये मागच्या महिन्यात जवळजवळ १४ नागरिकांना एका हत्तीने ठार केले आहे. या हत्तीने त्यांच्या कळपात चुकीची वर्तुणूक केल्याने त्याला बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. वन्य अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला आहे. २२ हत्तींच्या कळपातील १५ वर्षांच्या या हत्तीने गैरवर्तन केल्याने कळपातून बाहेर काढले होते. हत्ती कळपातून बाहेर गेल्यापासून त्याने आदिवासी क्षेत्रात धुमाकूळ घातला.
विभागीय वन अधिकारी सतीश चंद्र राय म्हणाले, या हत्तीने कळपात गैरकृते केल्याने २२ हत्तींच्या समुहाने बाहेर काढले होते. दरम्यान, या हत्तीवर आमचा अभ्यास सुरू आहे. तर २० अधिकाऱ्यांची टीम या हत्तीवर नजर ठेवून असल्याचे सांगण्यात आले. आम्ही नागरिकांच्या सुरक्षेबरोबर वन्य प्राण्याचीही सुरक्षा महत्वाची मानतो. या हत्तीला आपल्या कळपासोबत जोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत परंतु यामध्ये आम्हाला यश आले नसल्याचे सतीशचंद्र राय यांनी सांगितले.
कालच (दि.२५) या हत्तीने वयस्कर व्यक्तीला आपल्या सोंडेत धरत जोरात जमिनीवर आपटले होते. राय यांच्या माहितीनुसार हा हत्ती फक्त त्यांच्या वाटेत येणाऱ्या लोकांना ठार करत आहे. त्याच्या जवळ जाऊन त्याचा फोटो काढणाऱ्यांना या हत्तीने मारले आहे.
या हत्तीने आतापर्यंत कोणत्याही घरावर किंवा मुद्दाम कोणत्याही व्यक्तीवर हल्ला केल्याचे निदर्शनास आले नाही. आम्ही त्याला कळपात सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत जर त्याला कळपाने सामील केले नाही तर हा हत्तीला दुष्ट जाहीर करणार असल्याचे राय म्हणाले.