बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आढावा बैठकीसाठी कोल्हापुरात आले असता खानापूर युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि सीमाप्रश्नाबाबत आणि इतर विषयांवर सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले. खानापूर युवा समितीने दिलेल्या निवेदनात पुढील मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.
1) बेळगाव सीमाप्रश्न अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तरी महाराष्ट्र सरकारने खटल्याला गती देण्याचा प्रयत्न करावा.
2) न्यायप्रविष्ठ असलेल्या सीमाप्रश्नाच्या खटल्याला विलंब होत असल्याने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व आपल्या नेतृत्वाखाली मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वपक्षीय खासदारांसह भेट घेऊन सीमाप्रश्नाबाबत चर्चा करावी.
3) सीमाप्रश्नाचा तोडगा निघत नसेल तर बेळगाव सीमाभागात जैसे थे परिस्थिती ठेवावी यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्रावर दबाव आणावा
4) महाविकास आघाडी सरकारने बेळगावात सीमाकक्षाची निर्मिती करावी व सीमाभागसाठी नेमलेल्या सीमासमन्वयक मंत्री श्री. छगन भुजबळ व श्री. एकनाथ शिंदे यांनी बेळगाव सीमाभागात एकदाही भेट दिली नाही तरी त्यांनी यापुढे लवकरात लवकर भेट द्यावी व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, सीमाभागातील जनता आणि युवकांशी संवाद साधावा.
5) एमपीएससी व इतर ऑनलाइन परिक्षा अर्जात बेळगाव सीमाभागाचा उल्लेख व्हावा.
6) दीपक पवार लिखित महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प हे महाराष्ट्र सरकारने प्रदर्शित केलेल्या पुस्तकात असंख्य त्रुटी असून ज्या खानापूर तालुक्याने बेळगावसह सीमभागासाठी पहिला हुतात्मा नागप्पा होसुरकर यांच्या रूपात दिला व आजतागायत ज्या खानापूर तालुक्याने बेळगाव सीमाप्रश्नासाठी त्याग दिला त्याचा साधा उल्लेखही या पुस्तकात नाही तरी या पुस्तकाचे पुनर्लेखन व्हावे व पुनप्रकाशीत करावे.
7) महाराष्ट्र सरकारचे शिनोळी येथील शिक्षण केंद्राचे काम लवकरत लवकर पूर्ण करून शिक्षण केंद्र सीमावासीयांच्या सेवेत रुजू करावे.
8) सीमाभागातील मराठी शाळांवर कर्नाटक सरकारची वक्रदृष्टी आहे सोयी सुविधा न पुरविणे शिक्षकांची नेमणूक न करणे तरी महाविकास आघाडी सरकारने जो निधी मराठी शाळांसाठी व संस्थांसाठी मंजूर केला होता त्याची चाचपणी करून निधी वितरित करावा.
9) सीमाभागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
10) महाराष्ट्र सरकारच्या सर्व आरोग्य योजना बेळगाव सीमाभागासाठी लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा.
11) बेळगाव सीमभागातून प्रकाशित होणाऱ्या व महाराष्ट्र सरकारच्या मान्यता यादीवर असणाऱ्या मराठी वृत्तपत्रांना दरमहा दर्शनी जाहिरातींचा प्रस्ताव मंजूर करावा.
12) शिनोळी किंवा तुडये या परिसरात महाराष्ट्र सरकारद्वारे एम एफ मनोरा उभारून त्याच प्रसारण सीमाभागात उपलब्ध करून द्यावे अशा विविध प्रश्नांचे निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले.
यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष परशुराम नावलकर, किशोर हेब्बाळकर, राहुल पाटील, सचिव सदानंद पाटील तसेच चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.