खानापूर : गुंजी ता. खानापूर येथे पावसाळ्यात रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहून मधोमध कालवा पडला होता. त्यामुळे दुचाकी बरोबरच चार चाकी वाहनेही रस्त्यावरून चालवणे दुरापास्त झाले होते. गुंजी येथील रेल्वे टेशन रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती त्यामुळे या रस्त्यावरून नागरिकांना वाहन चालविणे अत्यंत धोक्याचे व त्रासदायक बनले होते. हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा गुंजी ग्रामपंचायतीला विनवणी करून देखील पंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले होते,
या रस्त्यावरून गुंजी बरोबरच रेल्वे स्टेशन वसाहत, संगरगाळी, तिवोली, मांगीनहाळ, तिओलीवाडा, या गावच्या नागरिकांना त्रास सोसावा लागत होता शेवटी गुंजी येथील युवा कार्यकर्ते पंकज कुट्रे, संजय बांदोडकर, तानाजी गोरल, कार्तिक बिरजे, दिगंबर थोरात, धीरज केळीलकर, चेतन घाडी, अजय नाळकर, या युवा कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरमधून माती आणून स्वतः श्रमदान करून हा रस्ता दुरुस्त करून वाहतुकीस योग्य केला आहे त्यामुळे गुंजी परिसरातील नागरिकांतून या युवकांनी केलेल्या स्तुत्य कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.