खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीच्या एकीच्या प्रक्रियेवर अखेर पडदा पडला. 2018 पासून दोन गटात दुभंगलेली समिती एकत्र आणण्यासाठी तालुक्यातील समितीनिष्ठ कार्यकर्ते व नेते मागील सहा महिन्यांपासून प्रयत्न करत होते. अखेर मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेत्यांच्या मध्यस्थीने एकीची प्रक्रिया पूर्णत्वास आली. खानापूर समितीमध्ये झालेली एकी ही समितीच्या विजयाची नांदीच म्हणावी लागेल.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीसंदर्भात खानापूर येथे दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी शिवस्मारक येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने नेमलेल्या सबकमिटीने दोन्ही समितीच्या गटांची बैठक घेऊन बैठकीमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांचे विचार ऐकून घेऊन दोन्ही गटातील आठ जणांची नावे जाहीर करण्यात आली. त्या आठ जणांनी खानापूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये संपर्क साधून नवी कार्यकारिणी करावी असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या निर्णयानुसार आज 10 जानेवारी 2023 रोजी आठ जणांपैकी पाच जणांनी 200 कार्यकर्त्यांच्या नावाची यादी मध्यवर्ती सबकमिटीकडे सुपूर्द करण्यात आली. या यादीसोबत पाच जणांनी आपले लेखी निवेदन मध्यवर्तीकडे दिले. या निवेदनानुसार या सबकमिटीने वरील यादी मधून अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सचिव म्हणून नेमणूक करण्याचे लेखी निवेदन दिले. त्यानुसार गोपाळराव बळवंतराव देसाई यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर यशवंत बिर्जे यांची कार्याध्यक्षपदी तसेच सिताराम नारायण बेडरे यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
वरील पदाधिकाऱ्यांनी खानापूर समितीची विस्तृत कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार वरील पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
या निवडीमुळे खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये व समितीप्रेमी जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.