जोयडा तालुक्यातील रामनगर येथील घटना
खानापूर : रस्त्याच्या बाजूने पायी चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना पाठीमागून आलेल्या बोलेरोने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना आज शुक्रवारी सायंकाळी उत्तर कन्नड जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील रामनगरजवळ घडली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, धारवाडहून रामनगर मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या बोलेरो वाहनाने चार महिला आणि एका पुरुषाला मागून जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला.
खानापूर तालुक्यातील घार्ली गावातील दुर्गा भुजंग काळसेकर (60), तुलसी तमन्ना गावडे (50) आणि पार्वती चुडाप्पा गावडे (55) अशी मृत महिलांची नावे आहेत. तसेच मंजुळा चंद्रकांत कोळसेकर आणि रामनगर येथील बिपीन दळवी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रामनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रामनगर रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta