खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक 30 जानेवारी रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते.
कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी प्रास्ताविक केले व बैठकीचा हेतू स्पष्ट केला तर सचिव सीताराम बेडरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात जनजागृती करून मराठी भाषिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी म. ए. समितीने तालुक्यात दौरा करावा व समितीची विस्तृत कार्यकारिणी करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात यावी अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. कार्यकर्त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या संमतीने पाच उपाध्यक्षांची नियुक्ती खानापूर समितीवर केली व काल झालेल्या बैठकीत रीतसर घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये गर्लगुंजी विभाग कृष्णा कुंभार, नंदगड विभाग अर्जुन देसाई, जांबोटी विभाग जयराम देसाई, लोंढा विभाग कृष्णा मनोळकर तर खानापूर शहर विभागासाठी मारुती गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी 10 वाजता शिवस्मारक येथे शिवरायांना अभिवादन करून कणकुंबी येथील माऊली मंदिरात पावती पुस्तकांचे पूजन करून देवीला साकडे घालण्यात येणार आहे. त्यानंतर जागृती दौऱ्याची सुरुवात करण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी समिती कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी दहा वाजता शिवस्मारक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले आहे.
बैठकीला माजी आमदार दिगंबर पाटील, ऍड. अरुण सरदेसाई, विलास बेळगावकर, विठ्ठल गुरव, रमेश ढबाले, आबासाहेब दळवी, अर्जुन देसाई, वसंत नवलकर, निरंजन सरदेसाई, शामराव पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, नारायण लाड, मारुतीराव परमेकर, रणजीत पाटील, जयराम देसाई यांनी आपले विचार मांडले.
यावेळी ज्येष्ठ सीमा सत्याग्रही पुंडलिक मामा चव्हाण, शटवाप्पा कदम, शंकर पाटील, समितीचे ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, मुकुंद पाटील, अजित पाटील, अविनाश पाटील, रुक्माणा झुंजवाडकर, प्रवीण पाटील, संतोष पाटील, दीपक देसाई, मर्याप्पा पाटील, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta