खानापूर : पंतप्रधान मोदी यांच्या कणखर धोरणांमुळे भारताचा मानसन्मान जगभरात वाढला आहे. जोपर्यंत देशात भाजपचे सरकार आहे तोपर्यंत मोदी पंतप्रधान राहतील. देशांप्रमाणेच कर्नाटकाचा समग्र विकास करण्याचे मोदींचे आणि भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीत कर्नाटकात 2/3 स्पष्ट बहुमताने भाजपला निवडून द्या, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
नंदगडमधील भाजपच्या जनसंकल्प यात्रेनंतर कित्तूर येथे काढलेल्या भव्य रोड शो दरम्यान मतदारांना संबोधित करताना राजनाथसिंह बोलत होते. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारत आज जगात सर्वात मोठा शक्तिशाली राजकीय पक्ष बनला आहे. जनतेच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळेच आज हाती आलेल्या तीन राज्यांच्या निकालात भाजप त्रिपुरा आणि नागालँडमध्ये सरकार स्थापन करण्यास चालला आहे, तर मेघालयमध्येही आमच्या जागा वाढल्या आहेत. मोदींच्या समर्थ नेतृत्वामुळे आणि धोरणांमुळे जगातील देश महागाईच्या तीव्र लाटेत होरपळत असताना भारताला याची सर्वात कमी झळ बसली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील आदींच्या नेतृत्वाखाली येत्या निवडणुकीत भाजपला दोन तृतीयांश स्पष्ट मताधिक्याने निवडून देऊन कर्नाटकाच्या विकासाला हातभार लावण्याचे आवाहन राजनाथसिंह यांनी मतदारांना केले.
तत्पूर्वी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, नंदगडमध्ये आज भाजपच्या विजय जनसंकल्प यात्रेला संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याहस्ते उद्घाटन झाल्यानंतर आता कित्तूरमध्ये ते रोड शो करत आहेत. याला लाभलेला तुमचा भव्य प्रतिसाद पाहता, कर्नाटकात पुन्हा भाजपचे कमळ फुलणार याचा विश्वास वाटतो. असेच भाजपच्या पाठीशी एकसंघ राहून भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून द्या असे आवाहन बोम्मई यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.प्रारंभी कित्तूरमधील प्रमुख चौकातून राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सजवलेल्या वाहनातून रोड शोला प्रारंभ करण्यात आला. राजनाथसिंह, मुख्यमंत्री बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, पालकमंत्री गोविंद कारजोळ, कित्तूरचे आमदार महांतेश दौडगौडर सजवलेल्या वाहनात उभे राहून मतदारांना अभिवादन करत होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी “भारतमाता की जय’, मोदी-मोदी असा जोरदार जयघोष केला. रोड शोच्या मार्गावर सर्वत्र भाजपचे झेंडे, भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. कित्तूर मतदारसंघातील गावोगावचे भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta