
खानापूर : खानापूर तालुक्यात सर्वत्र अंजली पर्वाला सुरुवात झाली आहे. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील गर्लगुंजी गावात शेकडो कार्यकर्त्यांसोबत रोड शो आणि कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी झाशीच्या राणीसारख्या लढवय्या अंजलीताईंना विधानसभेत पाठवा असे आवाहन जन समुदायाला केले.
यावेळी बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतलेल्या झाशीच्या राणीप्रमाणे लढवय्या वृत्तीने कर्नाटकच्या विधानसभेत डॉ. अंजली निंबाळकर गर्जना करतात. त्या उच्चशिक्षित, डॉक्टर आहेत, आपल्या मतदारसंघातील लोकांना मुलभूत सोयीसुविधा देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवून त्यांच्या बाजूने बोलणाऱ्या आमदार आहेत. त्यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून देऊन, आशीर्वाद देऊन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. अंजली निंबाळकर यांना विजयी करा असे सांगितले. सभेत बोलताना आ. डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या की, काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच प्रत्येक कुटुंबप्रमुख महिलेला दरमहा दोन हजार रुपये, युवनिधी म्हणून दरमहा तरुणांना बेरोजगारी भत्ता, प्रत्येक घराला दोनशे युनिट मोफत वीज देण्यात येईल. अन्नभाग्य योजनेत मोफत आणि अधिक तांदूळ पुरवठा केला जाईल, यासाठी येत्या दहा तारखेला काँग्रेस पक्षाला मतदान करा आणि आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले.
गर्लगुंजी येथे यावेळी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या समर्थनार्थ मोठा जनसमुदाय उभा असल्याचे दिसून आले. डॉ. अंजली निंबाळकर की जय, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
Belgaum Varta Belgaum Varta