
खानापूर : बेळगाव -गोवा राष्ट्रीय महामार्गात शेत जमीन गेलेल्या प्रभूनगर, निट्टूर, गणेबैल, हलकर्णी, हत्तरगुंजी, करंबळ, होनकल, माणिकवाडी, सावरगाळी, माडीगुंजी, लोंढा गावातील भूसंपादन केलेल्या जमिनीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. तसेच (अतिरिक्त भूसंपादन) ॲडिशनल जमिनीचे पैसे मिळाले नाहीत. पैसे मिळवण्यासाठी शेतकरी १० वर्षापासून प्रांताधिकार्यांच्या ऑफिसमध्ये हेलपाटे मारत आहेत. या शेतकऱ्यांकडे ना जमीन आहे ना जमिनीचे पैसे अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे.
हत्तरगुंजी, हलकर्णी, होनकल येथील सेवा रस्ता व भुयारी पुलासंबंधी अनेक वेळा प्रोजेक्ट डायरेक्टरांची भेट घेऊन अनेक वेळा आपल्या व्यथा मांडल्या आहेत. तरी या सेवा रस्ता व भुयारी पुलासंबंधी आश्वासना पलीकडे काही काम झालेले नाही.
तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बेळगाव -गोवा रोडवरील गणेबैल येथील टोल नाका चालू करण्याचा घाट घातलेला आहे. हा टोल नाका चालू करण्यापूर्वी भूसंपादन केलेल्या जमिनीचे शेतकऱ्यांना पैसे दिले जावे व तसेच बेळगाव ते गोवा हद्दीपर्यंत रस्ता पूर्ण झालेला नाही. हा रस्ता पूर्ण झाल्यावर टोल नाका चालू करण्याची आवश्यकता आहे. या टोल नाक्याला समस्त खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून व वाहनधारकांडून विरोध होण्याची संभवता आहे. या संबंधी बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद कोचेरी येत्या बुधवार दि. १२ जुलै रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून खानापूर तालुक्यातील समस्या निवारण्यासंबंधी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta