खानापूर : मतिमंद मुलामुळे कुटुंबाची बदनामी होत आहे. त्याच्या अशा वागण्यामुळे धाकट्या मुलाच्या लग्न जमत नाही अशा भीतीने बापानेच मतिमंद असलेल्या मोठ्या मुलाचा खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या खूनाचा तपास केवळ वीस दिवसात खानापूर पोलिसांनी केला आहे. निखिल राजकुमार मगदूम (२५, रा. बोरगल, ता. हुक्केरी) असे खून झालेल्या मतिमंद तरुणाचे नाव असून राजकुमार शंकर मगदूम (४५) असे संशयित बापाचे नाव आहे.
याबाबत मयताचे काका संतोष मगदूम यांनी खानापूर पोलिसांत आपल्या पुतण्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार दिली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, ३१ मे २०२३ रोजी रुमेवाडी क्रॉसजवळ मलप्रभा नदीच्या काठावरील शेतवडीत
अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या डोक्यावर जखमेचा घाव आणि मृतदेहाच्या बाजूला विषाची बाटली आढळून आली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून तपास सुरू केला होता. मृताचे वडील राजकुमार मगदूम याने बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून मुलगा बेपत्ता झाल्याचा कांगावा केला. तसेच मुलाच्या चिंतेने विषप्राशन करून स्वतः देखील आत्महत्येचा बनाव केला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला.
दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. मुलगा निखिल जन्माने मतिमंद होता. त्यामुळे कुठेही अर्धनग्न अवस्थेत फिरणे, शिवीगाळ करणे यासारखे प्रकार तो करीत होता. मोठ्या मुलाच्या अशा वागण्यामुळे धाकट्या मुलाला कोणीही मुलगी देणार नाही, ही भीती त्याला सतावत होती. जीवे मारण्याच्या उद्देशाने ३० मे रोजी दुपारी मुलगा निखिल याला खानापूरला आणले. मलप्रभा नदी काठावरील निर्जनस्थळी नेऊन त्याला विष पाजले. पण त्याचा जीव गेला नसल्याचे दिसून आल्याने आंब्याच्या झाडाच्या बुंध्यावर त्याचे डोके आपटून खून केला.
संशयित राजकुमार याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक गिरीश, जयराम हम्मनवर, मंजुनाथ मुसळी, ईश्वर जिन्नावगोळ आदींनी या प्रकरणाचा तपास लावला.
Belgaum Varta Belgaum Varta