खानापूर : खानापूर डेपोच्या बस गाड्या बेळगावकडे जाताना व खानापूरला येत असताना सर्विस रस्त्याने न येता परस्पर जात असल्याने विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच प्रवासी वर्गाला सुद्धा त्रास होत आहे.
खानापूरकडे व बेळगावकडे जाणाऱ्या बस गाड्या सर्विस रस्त्याने येऊन निटूर, इदलहोंड, गणेबैल, या ठिकाणी न थांबता परस्पर जात आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी खानापूर व बेळगावला येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व प्रवासी वर्गाला याचा नाहक त्रास होत आहे. तसेच विद्यार्थी वेळेवर शाळा, कॉलेजला न पोहचल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी भाजपा युवा नेते पंडित ओगले व मराठा मंडळ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहल पाटील यांच्या उपस्थितीत खानापूर बस डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांना निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते पण डेपो मॅनेजर उपस्थित नसल्याने त्यांच्या ऐवजी डेपोचे सुपरवायझर श्री. कांबळे यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
यावेळी पंडित ओगले यांनी डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांच्या बरोबर फोनवरून संवाद साधला व ही तक्रार त्यांच्या कानावर घातली. तक्रार ऐकून घेतल्यानंतर डेपो मॅनेजरनी सांगितले की, सर्व बस चालकांना सक्त ताकीद देण्यात येईल व सोमवार पासून जे बस चालक गाड्या थांबवणार नाहीत त्यांच्यावर पाळत ठेवून सक्त कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.
यावेळी पंडित ओगले, प्राचार्या स्नेहल पाटील यांच्यासह प्रभुनगर, इदलहोंड, गणेबैल, माळ अंकले, झाड अंकले, खेमेवाडी, येथील विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta