Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर तालुका समिती शिष्टमंडळाच्यावतीने महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन सादर

Spread the love

 

खानापूर : राज्यात अंगणवाडी सेविकांची नेमणूक करण्यात येत आहे. यात अंगणवाडी सेविका उमेदवारास प्रथम भाषा कन्नडची अट घातली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक गावात कन्नड भाषिक अंगणवाडी सेविकांची नेमणूक होणार आहे. त्यामुळे मराठी मातृभाषेच्या उमेदवारांवर अन्याय होऊन अंगणवाडीतील लहान बालकांना कानडी शिक्षण घेण्याची वेळ येणार आहे. यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन प्रथम कन्नड भाषेची अट रद्द करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दिले.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बेळगाव येथील निवासस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती शिष्टमंडळाने दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांची भेट घेतली व मराठी भाषीक गावात तसेच सीमाभागात ही अट रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी अल्पभाषिक आयोगाच्या निर्देशनानुसार मातृभाषेतूनच शिक्षणाचा अधिकार असल्याने अंगणवाडीत मातृभाषेतून शिक्षण दिले जाणे गरजेचे आहे. ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांना त्या बालकांना कन्नड मधून शिक्षण दिल्यास बालमनावर परिणाम होऊन कोणत्याच भाषेचे आकलन होणार नाही त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने तातडीने ही अट रद्द करावी, अशी मागणी यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, हा निर्णय राज्यस्तरीय घेतला गेला आहे. मात्र बेळगाव जिल्हा हा बहुभाषिक मराठी असल्याकारणाने या ठिकाणी निश्चितच मराठी भाषिकाला प्राधान्य दिले जाईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपण कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन यावेळी दिले.

यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, राजाराम देसाई, रमेश ढबाले, ब्रम्हानंद पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *