खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध चोवीस दलित संघटनांचे एकत्रिकरण करून खानापूर तालुका दलित महामंडळाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती लक्ष्मण मादार यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सर्व दलित संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खानापूर तालुक्यात जातीय सलोखा अबाधित असून तालुक्यातील या सलोख्याला तडा जाऊ नये, तसेच सर्व जाती जमाती आणि धार्मिक एकोपा रहावा आणि सर्व समुदायाच्या माध्यमातून विकास हेच उद्दीष्ट ठेवून तालुक्यातील विविध 24 दलित संघटनांचे एकत्रिकरण करून दलित महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. अलीकडे तालुक्यात काही बाहेरील व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे जातीय सलोख्याला तडा गेला आहे. त्यामुळे सर्वच दलित संघटनांनी याबद्दल खेद व्यक्त केला असून भविष्यात तालुक्यातील जातीय सलोखा अबाधित रहावा, यासाठी सर्वच संघटनांनी एकमुखी निर्णय घेऊन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या महामंडळाच्या माध्यमातून दलितांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच तालुक्यात इतर जातींवर तसेच दलितांवरही कोणताही अन्याय होऊ नये, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात येणार असून अधिकाऱ्यांचीही पिळवणूक होऊ नये, तसेच अधिकाऱ्यांकडून दलितांची आणि सामान्य जनतेची कामे वेळेवर व्हावीत, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती यावेळी लक्ष्मण मादार यांनी दिली. यावेळी दलित महामंडळ पदाधिकाऱ्यांची निवडही घोषित करण्यात आली असून यात महामंडळाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण मादार, कार्याध्यक्ष म्हणून वामन मादार तर उपाध्यक्ष म्हणून राजू कांबळे, रायाप्पा चलवादी, संतोष चित्तळे, यल्लाप्पा कोलकार, मल्लेशी पोळ यांची निवड करण्यात आली आहे. जनरल सेक्रेटरी म्हणून सन्नत होन्नायक, सहसेक्रेटरी म्हणून राजशेखर हिंडलगी तर कार्यदर्शी म्हणून रवि मादार, खजिनदारपदी राजू नाईक यांची निवड करण्यात आली आहे. तर सल्लागार मंडळात एन. सी. कोलकार, शिवाजी मादार, नागराज कलबुर्गी, भंडाळकर, नेरपादी कांबळे, प्रकाश मादार, सावित्री मादार यांची निवड करण्यात आली आहे.