खानापूर : पत्रकार असल्याचे सांगत खानापूर तालुक्यातील डॉक्टर तसेच शासकीय अधिकाऱ्यांना धमकी देत लुबाडणूक करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. यापुर्वी देखील खानापूर तालुक्यातील शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत पीडीओना काही तोतया पत्रकारांनी धमकी देत लुबाडणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आता या तोतया पत्रकारांनी तालुक्यातील डॉक्टरांना आपले सावज केले आहे.
नंदगड भागातील काही डॉक्टरना आपले लक्ष्य बनवून पैसे उकळू पाहणाऱ्या एका तोतया पत्रकाराला सोमवारी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले व अश्या तोतया पत्रकारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनने नंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सी. एस. पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात बरेच डॉक्टर प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. बेळगाव आणि धारवाड येथील काही तोतया पत्रकार नंदगड भागातील डॉ. किरण पाटील व डॉ. वैभव पाटील यांना फोनद्वारे संपर्क साधून तुमच्याकडे केपीएमई रजिस्ट्रेशन नाही त्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, तुमच्या मेडिकल प्रॅक्टिसचा परवाना देखील रद्द होऊ शकतो तुमच्यावरील कारवाई रोखण्यासाठी डीएचओशी संपर्क साधून तुमच्यावरील कारवाई रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करू मात्र त्यासाठी काही रक्कम आपल्याला द्यावी लागेल आणि जर ही रक्कम वेळेत दिली नाही तर तुमच्यावर निश्चित कारवाई होणार असे फोनवर धमकावले होते. त्यामुळे डॉक्टर्स असोसिएशनने सापळा दोघांना व्यक्तीना पकडून नंदगड पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र नंदगड पोलीस ठाण्यात त्याच्यावर रीतसर तक्रार दाखल न करता सदर तोतया पत्रकाराला समज देऊन सोडण्यात आले.
यासंदर्भात भाजपा युवा नेते पंडित ओगले तसेच खानापूर तालुका मेडिकल असोसिएशन यांनी नंदगड पोलीस निरीक्षक सी. एस. पाटील यांच्याशी संपर्क साधून त्या तोतया पत्रकार व त्यांच्या साथीदारांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाचा स्वीकार करून पोलीस निरीक्षक सी. एस. पाटील यांनी त्या स्वतः पत्रकारावर व त्यांच्या साथीदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पंडित ओगले, नंदगड ग्रामपंचायत अध्यक्ष मन्सूर तहसीलदार, डॉ. नागो पाटील, डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी डॉ.नाडगौडा, डॉ.सुनील पाटील, डॉ.पांडुरंग पाटील, डॉ.सागर नार्वेकर, डॉ.भालकेकर, डॉ.कुंभार, डॉ. वटारे, डॉ. चिट्टी, डॉ.शंकर पाटील, डॉ. अमर मोरे, डॉ. कब्बुर डॉ. परूशेट्टी, डॉ. एम. एम. पाटील, डॉ. फैयाज कित्तूर, डॉ. अख्तर नंदगडी, डॉ.राम पाटील यांच्यासह तालुक्यातील इतर डॉक्टर उपस्थित होते.