
गरिबांच्या बचतीवर चोरांचा डल्ला
खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथे आज दिवसाढवळ्या चोरट्यानी आपला मोर्चा वळवला व तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. नारायण लक्ष्मण सुतार यांच्या घरातील परसुतून चोरट्यानी आत प्रवेश केला व सामानाची नासधूस केली. ट्रांक पेटीतील रोख रक्कम व चांदीची जोडवी चोरली, आज चन्नेवाडी गावात एका वृद्धेचे निधन झाले होते त्यासाठी गावातील सर्व मंडळी अंत्यविधीला व नारायण सुतार यांच्या पत्नी महादेवी या अंगणवाडी सहकार्यकर्ती आहेत त्यामुळे त्या आपल्या कामात व्यस्त होत्या, घरी कोणीही नाही हे चोरट्याना माहीत होताच त्यांनी मुद्देमालावर डल्ला मारला, नारायण व महादेवी पै पै जमा करून घराचा गिलावा करण्यासाठी पैश्यांची साठवणूक केली होती पण त्यावरही चोरट्याने हात मारल्याने त्यांच्यावर हे आर्थिक संकट कोसळले आहे. यापूर्वी गावात कधीही चोरी घडली असे ऐकिवात नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. चन्नेवाडी सारख्या एका छोट्याश्या खेड्यात हा चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात येनकेन वस्तू विक्रीला घेऊन येणारेच हे संशयित वाटत असल्याचेही बोलले जात आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या चोऱ्या पाहता ग्राम पंचायतीने गावच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी होत आहे. नंदगड पोलिसांनी येऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta