बेळगाव : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला राज्य कारभार कसा चालावा हे समजण्यासाठी भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला व फाजल अली कमिशनची नियुक्ती करण्यात आली. त्या कमिशनने भाषावार प्रांतरचनेचा अहवाल दिनांक १६ जानेवारी १९५६ला जाहीर केला. त्या अहवालात बेळगांव, कारवार, सुपा, हल्याळ, खानापूर, निपाणी, बीदर, भालकी, संतपूर हा मराठी बहुभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक म्हैसूर राज्यात ठेवला. यामुळे मराठी माणसाच्या मनात उद्रेक निर्माण झाला व दिनांक १७ जानेवारी १९५६ रोजी संपूर्ण सीमाभागातील जनता रस्त्यावर आली. त्यावेळी बेळगांव व निपाणी येथे पोलीसांनी बेछूट गोळीबार करून ५ जणांचा बळी घेतला. त्या गोळीबारात बेळगांव येथे ४ तर निपाणी येथे १ हुतात्मा झाले. त्याच कालावधीत अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले, त्यापैकी खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावचा एक तरुण कै. नागाप्पा होसूरकर यांचा तुरुंगात पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यावेळेपासून सीमाभागात दरवर्षी १७ जानेवारीला कडकडीत हरताळ पाळून हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. त्यानुसार येत्या बुधवारी दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी खानापूर तालुक्यातील आम जनतेने आपापले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा व तसेच सकाळी ठीक ८:३० वाजता स्टेशन रोड खानापूर येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी विनंती खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी, श्री. प्रकाश चव्हाण, गोपाळराव पाटील , पांडुरंग सावंत, रुक्माणा झुंजवाडकर, शामराव पाटील, डी एम भोसले, राजाराम देसाई, नारायण देसाई, शिवाजी पाटील, पुंडलिक पाटील, अमृत पाटील, ब्रम्हानंद पाटील, व्ही यु देसाई, एम जी घाडी, संभाजी पाटील, जयसिंग पाटील, एम ए खांबले, एन एम पाटील, वासुदेव चौगुले व इतर कार्यकर्त्यांनी खानापूरच्या आठवडी बाजारात राजा शिवछत्रपती स्मारक स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ, भाजी मार्केट, बुरुड गल्ली मार्गे पत्रके जनजागृती केली.