मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते उद्घाटन
खानापूर : बेळगाव आणि गोवा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या बेळगाव-चोर्ला-गोवा सीमेपर्यंतच्या राज्य महामार्ग ७४८ -अ च्या दुरुस्तीला आज सुरुवात झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते कणकुंबी (ता. खानापूर) येथे या दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले. या ४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५८ कोटी ९० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. बेळगाव -चोर्ला- गोवा हा महामार्ग दोन्ही राज्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्चाचा आहे. परिणामी त्याचे नूतनीकरण गरजेचे आहे. या प्रकल्पाच्या सुरुवातीला बांधकाम होत असतानाही, रस्त्याच्या सद्यस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
यानंतर बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, नवीन रस्त्याच्या बांधकामासोबतच १० ते १२ किमी रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात येणार आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून बाजूला नाले बांधण्यात येणार आहेत. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी यापूर्वीच चर्चा झाली आहे. राज्यात राष्ट्रीय महामार्ग रस्ते बांधणीची अनेक कामे वेगाने सुरू आहेत. वनविभागाच्या जागेमुळे रस्त्याचे रुंदीकरण शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
गोकाक धबधब्याचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्यात येणार आहे. त्यासह बेळगाव शहरात उड्डाणपूल बांधण्याची योजना आखली असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात बरीच विकासकामे पूर्ण झाली असून त्यानुसार नवीन अर्थसंकल्पात चांगले प्रकल्प लोकांपर्यंत पोहोचवले जातील, असे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.
खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, विधान परिषद सदस्य नागराज यादव, केपीसीसी सचिव सुनील हणमण्णावर, दलित नेते मल्लेश चौगले, कणकुंबी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंता, उपविभागीय अधिकारी तसेच कणकुंबी ग्रामस्थ उपस्थित होते.