
खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्था बेळगाव नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिन साजरे करून समाजासमोर एक वेगळा आयाम निर्माण करत आलेली एक आदर्शवत शिक्षण संस्था आहे. मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर सौ. राजश्री नागराजू हलगेकर या अशा उपक्रमाबद्दल अग्रही भूमिका निभावत असतात. तसं पाहिलं तर भारतीय संस्कृतीचा कणा म्हणजे भारतीय नारी आहे आणि हा कणा ताठ राहिला तर आपल्या संस्कृतीचं जतन भावी काळात होणार आहे असं नेहमी बजावून सांगणाऱ्या समस्त महिला वर्गाबद्दल विशेष आदर व काळजी असणाऱ्या डॉ. सौ. राजश्री नागराजू (हलगेकर) यांनी गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय महिल दिनाचे औचित्य साधून महिलांच्या आरोग्याबद्दल विशेष जागरूकता निर्माण करण्यासाठी मोफत सॅनेटरी पॅडचे वितरण करण्याचा वसा चालवित आल्या आहेत.

याच विधायक उपक्रमाचा भाग म्हणून खानापूर येथील ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील महिला प्राध्यापक वर्गाने पुढाकार घेऊन प्राचार्य श्री अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर परिसरातील उपेक्षित महिला भगिनींच्या निवासात जाऊन महिलांना स्वयं आरोग्याबद्दल महत्व पटवून देवून सॅनेटरी पॅडचे मोफत वितरण केले. या उपक्रमात प्राध्यापिका सौ मनिषा बोकडे (एलजी), प्राध्यापिका श्रीमती मंगल पाटील-देसाई, प्राध्यापिका सो जयश्री मेरवा-शिवठकर, प्रा. आय सी सावंत, लेखनिक श्रीमती चित्रा अर्जूनवाडकर, संगणक प्रमुख सौ. सीमा पाटील-सावंतसह सर्व कर्मचारी व प्राध्यापक सहभागी होते.
या उपक्रमाला महिलांचा उत्साही सहभाग लाभला असून आपली काळजी करणाऱ्या शिक्षण संस्थेला या महिलावर्गाने आशिर्वादित केले आहे.
विशेष म्हणजे मराठी मंडळ शिक्षण संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालये असणाऱ्या सर्व भागात हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जातो व शेकडो, हजारो महिलांना सहभागी करून घेतलं जातं!
Belgaum Varta Belgaum Varta