कुमठा : “ना खाऊंगा ना खाने दुंगा” म्हणत पंतप्रधान मोदींनी गरीब लोकांना रस्त्यावर आणलं. निवडणुका बॉण्डद्वारे पैसा मिळवून मोठा भ्रष्टाचार केला आहे. दिलेला शब्द पाळणारी काँग्रेस आणि खते बियाणांवर जीएसटी लावून शेतकऱ्यांना जेरीस आणणारे भाजप सरकार यांच्यापैकी आपले भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे याचा विचार जनता नक्कीच करेल. आजपर्यंत भाजप सरकारने पोकळ आश्वासनांवर निवडणुका जिंकल्या आहेत. हिंमत असेल तर यावेळी त्यांनी केलेल्या विकास कामांवर बोलून मते मागावीत, असे आवाहन कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले.
कर्नाटकात भाजपची सत्ता असताना देखील मी अवघ्या पाच वर्षात खानापूर तालुक्यात विकास कामे केली आहेत. तर दुसरीकडे भाजप नेत्यांच्या पोकळ घोषणाबाजींची तीस वर्षे. काँग्रेस आणि भाजप यामध्ये हाच नेमका फरक आहे. भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी केलेल्या विकास कामांचा हिशोब त्यांनी द्यावा. त्यांच्यासोबत खुल्या चर्चेसाठी मी केव्हाही तयार आहे. भाजपच्या नेत्यांनी हिंमत असेल तर विकासावर बोलून मते मागावीत. आपल्या नेत्यांच्या नावावर मते मागणे ही केवळ भाजपची लाचारी असू शकते असे देखील त्या म्हणाल्या.
मावळी (तालुका भटकळ) जिल्हा पंचायत मतदार संघातील काँग्रेसच्या सभेत बोलत असताना त्या म्हणाल्या, गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर तो कितीही मोठा असला तरी त्यांची हयगय केली जाणार नाही. काँग्रसचे नेते म्हणजे हातांच्या पाच बोटाप्रमाणे आहेत. निवडणुकीत वज्रमुठीसारखे एकत्र येऊन काम करतात. जनतेने आशीर्वाद दिला तर गरिबांचा आवाज म्हणून संसदेत तुमच्या हक्कासाठी उभी राहील.
जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रामा मोगेर म्हणाले की, तीस वर्षात खासदार हेगडे संसदेत जिल्ह्याच्या विकासाबद्दल एकदाही बोललेले नाहीत. जातीधर्मांवर राजकारण करणाऱ्या भाजप सरकार पेक्षा धर्मनिरपेक्षतेने काम करत समानतेचा संदेश देणाऱ्या काँग्रेसला सत्तेत आणून संविधानात बदल करू इच्छिणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा.
जिल्हा पालकमंत्री मंकाळु वैद्य म्हणाले की, खोटे बोलणे आणि पक्ष फोडणे या पलीकडे भाजपने आजवर काहीच केलेले नाही. मी माझ्या पक्षाच्या कामावर आणि उमेदवाराच्या नावाच्या जोरावर मते मागत आहे. राज्यात भाजपला जनतेने नाकारले आहे. तो दिवस देखील दूर नाही जेव्हा भाजपला संपूर्ण देशातून हद्दपार केले जाईल.
सारदहोळे, शिराळी, मावळी येथील प्रचार सभांमध्ये उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साई गावकर, केपीसीसी संयोजक विश्वास अमिन, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अब्दुलमजीद शेख, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकटेश नायक, महिला अध्यक्ष नयना नायक, नामधारी समाजाचे नेते शुकरा नायक, देविदास गुडीगार, कृष्णा भंडारी, बैलूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष कृष्णा नायक, कायकीनी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू नायक, मच्छीमार संघटनेचे प्रमुख आनंद हरिकंत्र आदी उपस्थित होते.