खानापूर : खानापूर व परिसरात गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. खानापूर शहरांमध्ये अनेक, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे असून त्या सर्वांची आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर खानापूर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने अध्यक्ष पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी विविध मागण्यांसाठी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून तहसीलदार, पोलीस खाते, नगरपंचायत व हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या अधिकाऱ्यांना परवानगी मिळविण्यासाठी पळापळी करावी लागते. त्यासाठी एक खिडकी कार्यालयाची स्थापना करून, एकाच ठिकाणी परवानगी देण्याची विनंती, तहसीलदारांना करण्यात आली. तर पोलीस स्थानकाचे पीआय मंजुनाथ नाईक यांची भेट घेऊन गणेश उत्सवात अकरा दिवसाच्या काळामध्ये खानापूर शहरात राजाश्री शिवछत्रपती चौक ते महाजन खुट पर्यंत दुचाकी व चार चाकी गाड्यांना बंदी घालण्यात यावी. जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नही. तसेच प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोर, एका होमगार्डची नेमणूक करण्यात यावीत, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी महामंडळाच्यावतीने हेस्कॉमचे अधिकारी जगदीश मोहिते यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात 24 तास अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यात यावा व गणेशोत्सवापूर्वी खाली लोंबकळत असलेल्या विद्युत तारा उंच करून बांधणे, तसेच छोट्या मोठ्या दुरूस्ती आताच करून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच गणेशोत्सव काळात, होणाऱ्या मिरवणुकीत गणेश मूर्तीच्या गाड्यांना तारा लागुन काही अनुचितत घटना घडू नयेत, म्हणून, दक्षता घेण्यासाठी 4 ते 5 वायरमनची नेमणूक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांचीही भेट घेण्यात आली व गणेशोत्सवापुर्वी, खानापूर शहरातील प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडलेले असुन तात्काळ खड्डे बुजविण्याची मागणी व गणेश मूर्ती विसर्जनासाठी क्रेन्सची व्यवस्था करण्याची मागणी महामंडळाच्या वतीने यावेळी करण्यात आली.
यावेळी गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष पंडीत ओगले, कार्याध्यक्ष रवी काटगी, सेक्रेटरी अमृत पाटील, सल्लागार आप्पया कोडोळी, राहुल सावंत, शिवा मयेकर, राजु चौगुले, संतोष देवलतकर, धनाजी देवलकर, हरीष शीलवंत, यशु पाटील, दीपक केसरकर, तसेच आदीजण कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.