बेळगाव : सुपीक जमिनींच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन बेळगाव-धारवाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गावरून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. देसुर, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, प्रभुनगर, गर्लगुंजी, आणि केकेकोप यासारख्या गावांतील शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. त्यांच्या मते, या प्रकल्पामुळे सुपीक जमिनी आणि बहुफसली शेती धोक्यात येणार आहे.
सुपीक जमीन गमावण्याचा धोका
शेतकऱ्यांनी सांगितले की, या भागात 300-400 बोरवेल आहेत आणि येथे तीन-चार प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. जर हा रेल्वे मार्ग या जमिनीतून गेला, तर शेतकऱ्यांची अन्नधान्य निर्मितीचे साधनच नष्ट होईल. यामुळे हजारो शेतकरी आणि त्यांचे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडतील.
पर्यायी मार्गाची शिफारस
गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रसाद पाटील यांनी या रेल्वे प्रकल्पासाठी नापीक जमिनींचा वापर करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर दुसऱ्या सर्वे नुसार रस्ता केल्यास 3 ते 4 किलोमीटर अंतर कमी होईल आणि 50 ते 100 कोटी बजेट पण कमी होईल. आजी माजी खासदार यांच्या वैयक्तिक स्वार्थामुळे हा पर्यायी मार्ग नाकारला गेला. सदर नेत्यांनी आपल्या गावात गोडाऊन उभारण्यासाठी अट्टाहास केल्यामुळे सुपीक जमिनींच्या नुकसानाला प्राधान्य दिले जात आहे. असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांचा लढा सुरूच राहणार
प्रसाद पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसी दबाव टाकला जात आहे. मात्र, सर्व गावांतील शेतकरी या प्रकल्पाला तीव्र विरोध करत असून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असून पुन्हा या जमिनींचा सर्वे न झाल्यास उपोषणाचा निर्णय घेतला जाईल. आणि हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील.
शासनाकडे मागणी
शेतकऱ्यांनी रेल्वे विभाग, मंत्रिमंडळ आणि प्रशासनाला विनंती केली आहे की, हा प्रकल्प सुपीक जमिनींऐवजी नापीक जमिनीतून मार्गक्रमित केला जावा. त्यांनी सरकारला या प्रकल्पाचा फेरविचार तसेच नवीन सर्वे करण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.