
जांबोटी सोसायटीच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव
खानापूर : आज सहकार क्षेत्र ऐन उमेदीत असताना ही चळवळ चालविणे कठीण झाले आहे. सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजांसाठी सहकार टिकणे आवश्यक आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांनीच सहकार टिकवला आहे. तो वाढवण्याची सगळ्यांची जबाबदारी आहे, असे मत जांबोटी मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी व्यक्त केले.
जांबोटी मल्टिपर्पज सोसायटीच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव बुधवारी (दि. १) झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. ते म्हणाले, जांबोटी पतसंस्थेने शेतकरी, कष्टकऱ्यांवर विश्वास दाखवून कर्ज पुरवठा केला. गाव आणि नाव न बघता अर्थसहाय्य केले. त्यामुळेच संस्थेविषयी सर्वत्र आपुलकीचे नाते निर्माण झाले. त्यातूनच आठ शाखातून संस्था उत्तम कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, सहकार संस्थांनी केवळ कर्ज वितरणापुरते मर्यादीत न राहता उद्योगांकडे वळावे. ही संस्था जांबोटी भागाची आर्थिक नाडी ठरली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. माजी आमदार अरविंद पाटील यांनी संस्थेने जपलेली सामाजिक बांधिलकी आदर्शवत असल्याचे सांगितले. वकील संघटेनचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी, खानापूर तालुका पतसंस्थेचे अध्यक्ष आबासाहेब दळवी, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांची भाषणे झाली.
संचालक भैरु पाटील यांनी स्वागत केले. संचालक अण्णासाहेब कुडतरकर यांनी केले. प्रामाणिक व्यवहार केल्याबद्दल तुकाराम भेकणे, अमर जोरापुरे, रामदास घाडी, रामचंद्र खांबले, श्रीकांत लक्केबैलकर यांच्यासह विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला व्हन्नव्वादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, संचालक विद्यानंद बनोशी, यशवंत पाटील, पांडूरंग नाईक, शाहू गुरव, हणमंत काजुनेकर, खाचाप्पा काजुनेकर, वाघू पाटील, पुंडलिक गुरव, भाऊ कुर्लेकर, भरमाणी नाईक, संचालिका गिता इंगळे, सरस्वती पाटील, व्यवस्थापक सुर्यकांत बाबशेट आदींसह कर्मचारी, सभासद उपस्थित होते. उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta