
खानापूर : बेळगाव – चोर्ला मार्गावरील मलप्रभा नदीवर असलेल्या कुसमळी नजीकच्या पुलाची प्रत्यक्ष पाहणी कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी केली असून एका आठवड्यानंतर या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, खानापूरचे तहसीलदार दूंडाप्पा कोमार यासह खानापूर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
बेळगावहून गोव्याला जोडणारा बेळगाव-चोर्ला मार्गावर असलेल्या कुसमळी नजीकचा पुल गेल्या महिनाभरापासून बंद आहे. पर्यायी रस्ता काढण्यात आला होता मात्र अतिवृष्टीमुळे नदीला पाणी आल्याने तो रस्ताही दोन वेळा वाहून गेला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः खानापूर किंवा रामनगर मार्गे वळवण्यात आली. सदर पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुलाचे स्लॅब टाकून केवळ 25 दिवस झाले आहेत स्लॅब टाकल्यानंतर किमान 35 दिवस पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरून अवजड वाहतूक करू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत त्यामुळे सध्या केवळ लहान चारचकी वाहनांना परवाना देण्यात आला आहे. अवजड वाहनांना या मार्गावरून वाहतूक करण्यासाठी आठवड्याभराचा कालावधी लागेल अशी माहिती यावेळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंत्री कृष्ण भैरेगौडा यांना दिली. या पुलावरील दोन्ही बाजूच्या भिंती व रस्ता करण्याचे काम शिल्लक असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta