
खानापूर : खानापूर हेस्कॉम उपविभागात आजपासून प्री-पेड मीटर योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील पहिले प्री-पेड मीटर अर्बन बँक चौक येथे नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या श्री दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळाला तात्पुरत्या वीज जोडणीसाठी बसविण्यात आला.
या उपक्रमाचा उद्देश वीजपुरवठा पारदर्शक आणि अखंडित ठेवण्याचा असून, मोबाईलप्रमाणे रिचार्ज पद्धतीने वीज वापरण्याची ही नवी सेवा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. विजेचे बिल अगोदर भरावे लागणार असून, रिचार्ज संपल्यानंतर वीजपुरवठा आपोआप खंडित होणार आहे.
या प्रसंगी हेस्कॉमचे स्थानिक अधिकारी लक्ष्मी रंगनाथ (AE), ब्रेन धर्मदास (AAO), भरतेश नागनूर (AE), सिद्धू अंगडी (JE), दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक व माजी नगरसेवक दिनकर मरगाळे, कंत्राटदार रंजीत जाधव, राजू पारकर, अश्पाक तिगडी तसेच हेस्कॉमचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
👉 प्री-पेड मीटर योजनेमुळे ग्राहकांना वीज वापराबाबत पारदर्शक माहिती मिळणार असून, वेळेत बिल भरण्याची सवय लागेल अशी अपेक्षा हेस्कॉमचे AEE जगदीश मोहिते यांनी व्यक्त केली आहे. तसेच रिचार्ज संपल्यास मोबाईलवरून रिचार्ज करता येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta