

खानापूर : आज गुरुवार दि. २ रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास रामनगर-अळणावर मार्गावरील कुंभार्डा (ता. खानापूर) गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात दोन पादचारी जागीच ठार झाले आहेत. सीमा अमर हळणकर (२४) आणि रवळू भरमाणी चौधरी (६५), दोघेही रा. कुंभार्डा, अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
कुंभार्डा गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पहाटे साडेसहाच्या सुमारास सदर अपघात घडला. सीमा हळणकर या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या, तर रवळू चौधरी हे आपल्या शेताकडे जात होते. धारवाडच्या दिशेने मार्गावरून पायी जात असताना, मागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, दोघेही रस्त्याच्या कडेला फेकून पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
चालक वाहनासह फरार
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी खानापूर पोलिसांना संपर्क साधला. खानापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी खानापूर सरकारी दवाखान्यात हलवले आहेत. अपघात करून चालक वाहनासह फरार झाला असून, खानापूर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta